सचिन धानजी, मुंबई
माहिम-दादर परिसरातील सफाई कामगारांची सर्वांत मोठी वसाहत असलेल्या कासारवाडीचा (Kasarwadi) आता कायापालट होत असून आश्रय योजनेतंर्गत या वसाहतींचा विकास लांबणीवर पडला असला, तरी आश्रयपूर्वीच या वसाहतींचा मेकओवर होत आहे. त्यामुळे आजवर छोट्याशा कोंदट वातावरणात राहणाऱ्या या कुटुंबांना चांगल्याप्रकारच्या सेवा सुविधांसह मोकळ्या वातावरणात राहण्याचा आनंद मिळणार आहे. (BMC)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या प्रचार रॅलीत सहभागी ६ पोलिसांचा झाला अपघाती मृत्यू)
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास सध्या आश्रय योजनेतंर्गत (Ashraya Scheme) हाती घेण्यात आला आहे. मात्र, माहिम दादर कासारवाडीतील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आश्रय योजनेतंर्गत नेमलेल्या विकासक कंत्राटदाराचा प्रस्ताव स्थायी समितीने नाकारल्याने या वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग बंद झाला होता. सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करताना याच वसाहतींमध्ये प्रथम पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता, परंतु त्याच वसाहतींचा पुनर्विकास प्रकल्प रद्द झाल्याने येथील भाडेकरूंना जुन्याच घरात राहण्याची वेळ आली होती.
परंतु या वसाहतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक खासदार राहुल शेवाळे आणि स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या सुचनेनुसार भेट देत सफाई कामगारांच्या घरांची पाहणी केल्यानंतर त्यांनी यासर्व वसाहतींची तात्काळ दुरुस्ती करून त्या भागाला जास्तीत जास्त सेवा सुविधा दिल्या जाव्यात. मुंबईची घाण साफ करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांच्या कुटुंबाची काळजी घेण्याची महापालिकेची आणि पर्यायाने सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या वसाहतींमधील कुटुंबांच्या घरांची डागडुजीसह वसाहतींमध्ये चांगल्या प्रकारे सेवा सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशसनाने या वसाहतीच्या दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
(हेही वाचा – Terrorists Killed In Pakistan : भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची पाकिस्तानात काय आहे स्थिती; पाकिस्तानने नाकारली जबाबदारी)
कासारवाडीतील (Kasarwadi) या सफाई कामगारांच्या वसाहतीतील चाळी या १९४० पूर्वीच्या असून याठिकाणी तळ अधिक एक मजल्याच्या दोन अधिक इतर बैठ्या अशा प्रकारे १३ चाळी आहेत. या ठिकाणी सुमारे २४० भाडेकरु राहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे.
बैठ्या पत्र्याच्या चाळी बनणार पक्क्या
या ठिकाणी बैठ्या चाळी या पत्र्याच्या असून त्या तोडून त्यांचे पक्के बांधकाम केले जात आहे. त्यामुळे सध्याच्या त्यांच्य घरांची उंची ९ फुट एवढी असून त्याची उंची आता १२ फुटापर्यंत केली जाणार आहे. या घरांना न्हाणीघर नसल्याने त्यांना उघड्यावर आंघोळी करावी लागत असल्याने आता नव्याने बांधकाम करताना त्यात न्हाणीघराचीही व्यवस्था करून दिली जाणार आहे. सध्या येथील काही कुटुंबांना तेथील संक्रमण शिबिरांमधील घरांमध्ये पर्यायी स्थलांतरीत करून या चाळींचे बांधकाम केले जात आहे. टप्प्याटप्प्याने येथील पत्र्याच्या चाळींचे पक्के बांधकाम केले जाणार आहे. तर तळ अधिक एम मजला चाळींची कौले बदलून रंगरंगोटी करून एकप्रकारे या चाळीचा लूक बदलला जाईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शौचालयांच्या दुरुस्तीसह नवीन शौचालयांची बांधणी
या सर्व चाळींसाठी १२ ते १३ शौचालयांची सुविधा असून त्यातील सध्याच्या शौचकुपांच्या तुलनेत अधिक वाढ केली जाणार आहे. सध्याची सर्व शौचकुपे ही भारतीय पध्दतीची असून या रहिवाशांच्या सुचनेनुसार त्यातील काही शौचकुपेही कमोड पध्दतीची बनवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Rescue : नितीन गडकरी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना केले आश्वस्त)
पुन्हा एकदा कबड्डी आणि खो-खो पटू बनतील
या सफाई कामगारांच्या वसाहतींमध्ये एकेकाळी कबड्डी आणि खो-खो खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या आणि या वसाहतीतील अनेक कबड्डी आणि खो-खो चे खेळाडू स्थानिक पातळीवर बनले गेले. परंतु यासाठी असलेले मैदान सध्या पडिक जागा म्हणून पडून होती. या जागेवर आता स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल खेळाचे मैदान बनवण्याची मागणी झाली होती, त्यानुसार या मैदानाची उभारणी केली जात आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या कासारवाडीत कबड्डी, खो-खोच्या स्पर्धा आयोजित होऊन येथील मुलांना या खेळाचा आनंद लुटता येईल.
उद्यानाचीही सुविधाही
आजवर या वसाहतीत पाऊल टाकल्यानंतर येथील ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरता व चालण्याकरता योग्य जागा नव्हती. परंतु आता याठिकाणी कचरा फेकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेचा विकास करून त्या ठिकाणी उद्यान विकसित करण्यात येत आहे. ज्या उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सकाळ व संध्याकाळ चालता येईल व क्षणभर विश्रांती घेण्यासाठी उदयानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एखाद्या कार्पोरेट कार्यालयाच्या हद्दीत असणाऱ्या उद्यानाप्रमाणे हे उद्यान विकसित करून जॉगिंग टँकची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
(हेही वाचा – ICC Cricket World Cup : या विश्वचषकात भारत प्रथमच ऑलआऊट)
दवाखाना आणि अभ्यासिका
याठिकाणी कंटेनर स्वरूपात आपला दवाखाना आणि मुलांसाठी अभ्यासासाठी अभ्यासिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले आहे. या अभ्यासिकेमध्ये २४ मुलांची अभ्यास करण्याची क्षमता असून एमपीएससीपर्यंतच्या अभ्यासाची पुस्तकेही याठिकाणी उपलब्ध आहेत. दवाखान्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला, तसेच आसपासच्या रहिवाशांना या आपला दवाखान्याच्या सुविधेचा लाभ घेता येईल. तसेच कंटेनर स्वरूपात हे बांधकाम करण्यात आल्याने भविष्यात याचा पुनर्विकासाचे काम हाती घेतल्यास ते कंटेनर इतर जागेत हलवले जाऊ शकतात.
सर्व चाळींना रंगरंगोटी
येथील चाळींना एकाच प्रकारच्या रंगाचा वापर केला जाणार असून आकर्षक रंगरंगोटीमुळे या वसाहतीचा लूक एकदमच बदलला जाणार आहे. शिवाय पावसाळी पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. याबरोबरच बालवाडीचेही काम हाती घेण्यात येत असून सर्व प्रकारची कामे येथील भाडेकरु रहिवाशांना विश्वासात घेऊन केली जात आहेत. रहिवाशांचे योग्य सहकार्य लाभत असल्याने ही कामे योग्यप्रकारे केली जात असून लवकरच या वसाहतीचा कायापालट झालेला पहायला मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community