1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना घेता येणार लस… केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

163

सध्या देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू करण्यासाठी आता भारत सरकारने नवीन योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लसींचे दर, उपलब्धता आणि लस पुरवठा करण्यासाठीच्या यंत्रणेवर चर्चा करण्यात आली. 18 वर्षावरील सर्वांना 1 मेपासून लस देण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील व ६० वर्षांवरील पात्र नागरिकांना लस देण्यात येत होती. पण लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

काय आहेत बैठकीतील निर्णय?

  • लस उत्पादन करणा-या कंपन्यांनी तयार केलेल्या लसीच्या ५० टक्के लसींचा पुरवठा सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीला देणे बंधनकारक आहे. तर इतर ५० टक्के पुरवठा राज्य सरकार व खुल्या बाजारात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • लस उत्पादकांना राज्य सरकार व खुल्या बाजारातील लसींची किंमत ही १ मे २०२१ पूर्वी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • या ठरवलेल्या किंमतींच्या आधारे राज्य सरकार, खाजगी रुग्णालये इत्यादिंनी लस विकत घ्यायची आहे.
  • आधीप्रमाणेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना मोफत लस देण्यात येईल.
  • 45 वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण सुद्धा चालू राहील.
  • एक डोस घेऊन झालेल्या सर्व कर्मचारी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना दुस-या डोससाठी प्राधान्य देण्यात येईल.

  • भारत सरकारकडून राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात येणारा लसींचा साठा हा त्या राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येप्रमाणे असेल.
  • राज्य प्रशासनामार्फत लसीकरणाचा वेग कमी असल्यास त्या राज्यांना जास्त पुरवठा केला जाणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून, तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करुन आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसींचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.