ICC Cricket World Cup : भारताचे स्वप्न भंगले; ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेतेपदाचा ‘षटकार’

177
ICC Cricket World Cup चा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या एकदिवसीय सामान्यांच्या विश्वविजेतेपदाचा षटकार लगावला आहे. भारताचा ६ विकेट राखून पराभव करून ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकामध्ये अभूतपूर्व विजय मिळवला. १९७५ पासून ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ असे पाच वेळा विश्वचषक पटकावला होता. आता ऑस्ट्रेलियाने २०२३मध्ये विजय मिळवत विश्वविजेता होण्याचा षटकार मारला आहे.

तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याची भारताची संधी हुकली 

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी होती. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने उत्तम खेळ करत हा अंतिम सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अचूक मारा 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडून के एल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने अवघ्या ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. भारताने पहिल्या १० षटकांत ८० धावा करत दमदार सुरुवात केली होती, मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. ११ ते ४० षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांना केवळ दोनच चौकार लगावता आले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अचूक नियोजनासह शानदार गोलंदाजी केली.

ट्रॅव्हिस हेडची धमाकेदार खेळी

मात्र जेव्हा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एकूण ४७ धावांवर तीन विकेट पडल्या, तेव्हा भारत जिंकेल अशी अशा निर्माण झाली असतानाच मार्नस लाबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला, यात ट्रॅव्हिस हेडने १३७ धावा बनवल्या त्या जोरावर ऑस्ट्रेलिया ६ विकेटने हा अंतिम सामना जिंकला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.