अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणातील आरोपींबाबत संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला असून, या आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या काही गोष्टी तपासातून समोर आल्या असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यातील दोन आरोपी इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली.
या दोघांसह नऊ आरोपींची पोलीस कोठडी संपुष्टात आल्याने अकरा आरोपींना सोमवारी, २० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात मुख्य आरोपी ललित पाटील (Lalit Patil), सुभाष मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलु अन्सारी, अरविंदकुमार लोहरे, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांचा समावेश आहे. या प्रकरणात करण्यात आलेल्या तपासावरून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती, ड्रग्जची साठवण, वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली असून, त्यातील प्रत्येकाचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकार्यांनी न्यायालयात केली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली. या आरोपींकडून मेफेड्रोनची बाजार भाव प्रमाणे किंमत दोन कोटी चौदा लाख तीस हजार सहाशे एवढी असून, या अमली पदार्थाच्या विक्रीतून आरोपींनी आठ किलो सोन्याची बिस्किटे चार चाकी गाड्या व महागडे मोबाईल हँडसेट असा एकूण 5 कोटी अकरा लाख 45 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज खरेदी केलेला आहे असे निष्पन्न झाले आहे.
(हेही वाचा Maharashtra Cricket Association Stadium : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची काय आहेत १० वैशिष्ट्ये?)
Join Our WhatsApp Community