अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या पुजारी पदासाठी ३००० उमेदवारांनी अर्ज केले. यापैकी २०० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. मकर संक्रांतीनंतर रामलल्ला २२ जानेवारी २०२४ला प्राणभव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.
राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सोमवारी सांगितले की, २00 उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे. ट्रस्टकडून या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले आहे. अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे (VHP) मुख्यालय असलेल्या कारसेवक पुरम येथे या मुलाखतीचे आयोजन करण्याता आले आहे.
ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, वृंदावनचे जयकांत मिश्रा आणि अयोध्येचे दोन महंत मिथलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती उमेदवारांची मुलाखत घेत आहे.
(हेही वाचा – Maratha OBC Reservation म्हणजे इंडिया-पाक नव्हे – संभाजी राजे छत्रपती )
काय आहेत अटी आणि नियम ?
मुलाखतीसाठी निवड झालेल्या २०० उमेदवारांपैकी २० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर ६ महिने या उमेदवारांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची पुजारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. विविध पदांवर या पुजाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेली नाही, असे उमेदवारही मंदिर ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. त्यानंतर फक्त प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना भविष्यात संधी दिली जाऊ शकते. उमेदवारांचे प्रशिक्षण आध्यात्मिक संतांनी तयार केलेल्या धार्मिक अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना अन्न आणि राहण्याची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. याशिवाय २,००० मानधनही दिले जाईल, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी दिली आहे.
कोणते प्रश्न विचारले जाणार ?
या मुलाखतीदरम्यान उमेदवारांना विविध प्रकारचे अनेक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. मुख्यत: ‘संध्या वंदन’ म्हणजे काय ? या पूजेचा विधी कसा करतात? पूजेसाठी कोणता मंत्र म्हटला जातो ? भगवान श्रीरामाची पूजा करण्यासाठी कोणता मंत्र म्हणतात? याकरिता कर्मकांडातील कोणते विधी करणे आवश्यक आहे? अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
पूजेची पद्धत रामानंदिय पंथानुसार…
सध्या राम मंदिरात पंचोपचार पद्धतीप्रमाणे पूजा केली जाते, मात्र २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामानंदिय पंथानुसार पूजा केली जाईल. मुख्य पुजारी, सहाय्यक पुजारी आणि मंदिराचे सेवक राम लल्लाची पूजा करतील. या पंथानुसार केलेली पूजा पद्धती वैशिष्ट्यपूर्ण असून यामध्ये हनुमान चालीसाप्रमाणेच रामाची स्तुती केलेली नवीन पोथी लिहिण्याचे कामही सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community