काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘पनौती मोदी’ असा अवमानकारक उल्लेख केला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात वकील विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी असा उल्लेख करणे लज्जास्पद आणि अपमानास्पद असल्याचे सांगत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
राजस्थानमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ‘पीएम म्हणजे पनौती मोदी’. क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी या शब्दाचा उल्लेख पंतप्रधान मोदींबाबत(PM Narendra Modi) केला. सामन्यातील पराभवानंतर ‘पनौती’ हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांबद्दल गांधींचे वक्तव्य ‘लज्जास्पद, निंदनीय आणि अपमानास्पद’ होते.
(हेही वाचा National Herald : यंग इंडियाची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; सोनिया-राहुल गांधींची ७६ टक्के भागीदारी)
त्यांनी आपले खरे रंग दाखवले आहेत, पण त्यांची आई सोनिया गांधी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी (PM Narendra Modi) यांना ‘मृत्यूचे व्यापारी’ म्हटल्यावर गुजरातमध्ये काँग्रेस कशी बुडाली हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.
Join Our WhatsApp Community