महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय हे ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आले. त्यानंतर ते वाढवून ६२ वर्षे करण्यात आले. आता पुन्हा हे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यासाठी रुग्णालयातील प्राध्यापक डॉक्टरांकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी राजकीय स्तरावर ६२ वर्षे पूर्ण होणाऱ्या डॉक्टरांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे पठवला असून आयुक्तांनी सध्या तरी या डॉक्टरांना त्या पदावर न राहता मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक म्हणून राहू शकतात, या अटीवर वय वाढवून देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा त्याच पदावर अजून तीन वर्षे राहण्याचे वरिष्ठ डॉक्टरांचे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता आहे.
डॉक्टरांचे वय वाढवून दिल्यामुळे जे कनिष्ट डॉक्टर असतात, त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढवून देण्यास आमचा विरोधच आहे. पण कोविडचा काळ लक्षात घेता त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे त्यांना वय वाढवून द्यावे. पण त्यांना त्या पदावर न ठेवता सल्लागार प्राध्यापक पदावर ठेवले जावे. सध्या प्राध्यापक डॉक्टरांची कमतरता आहे. तिथे त्यांना सल्लागार म्हणून नेमून त्या साखळीतील कनिष्ठ डॉक्टरांना बढती देत त्या पदावर बसवले जावे. ज्यामुळे डॉक्टरांमधील समतोल राखला जाईल व काम करण्याची उमेदही वाढेल.
– राजुल पटेल, अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य समिती
त्यामुळे कनिष्ट डॉक्टरांवर अन्याय होतो!
मुंबईतील डॉक्टरांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून वाढवून ते ६० वर्षे एवढे केले. त्यानंतर वय वर्षे ६० वरून ते ६२ एवढे करण्यात आले. पण आता हेच निवृत्ती वय ६५ एवढे करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची मोर्चेबांधणी सुरु आहे. येत्या मे महिन्यामध्ये काही वरिष्ठ डॉक्टर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६५ वर्षे करण्यात यावे यासाठी डॉक्टर असाेसिएशन प्रयत्नशील आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका रुग्णालयांमधील वरिष्ठ डॉक्टरांनी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना दिला आहे. काकाणी यांनी हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. परंतु त्यामुळे कनिष्ठ डॉक्टरांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. वरिष्ठ डॉक्टर्स निवृत्तीचे वय जवळ आले की वय वाढवून घेतात आणि त्यामुळे कनिष्ट डॉक्टरांवर अन्याय होतो. जर अशाप्रकारे वरिष्ठ डॉक्टरांचे निवृत्तीचे वय वाढवून दिले गेल्यास आपल्याला कधीच बढती मिळणार नाही. त्यामुळे कनिष्ट डॉक्टरांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे. निवृत्ती वय वाढवण्यासाठी काही वरिष्ठ डॉक्टर सरकारमधील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून आपली उपयुक्तता किती आहे आणि त्यासाठी कशाप्रकारे निवृत्तीचे वय वाढवून दिले जावे असे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
(हेही वाचा : सोनू सूदने आरोग्य व्यवस्थेसमोर टेकले हात! )
सल्लागार म्हणून वय वाढवून देण्यास प्रशासनाची तयारी!
मात्र, या सर्वांचा प्रस्ताव आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे आला असता त्यांनीही या सर्वांना वय वाढवून द्यावे, पण त्यांना विद्यमान प्रमुख पदावर राहता येणार नाही. त्यांना कोणतेही प्रशासकीय पद देता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तसेच त्यांना सल्लागार प्राध्यापक म्हणून घ्यावे, असे मत त्यांनी मांडले असल्याचे समजते. त्यामुळे वरिष्ठ डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढवून घेण्याचे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community