शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ताप येत असल्याने कांदिवलीतील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात खातेप्रमुख या पदावर कार्यरत आहेत.
शेवटची फेसबूक पोस्ट
हे उपचार सुरू असतानाच त्यांनी फेसबूकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकली होती आणि मी पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही, अशी खंत व्यक्त करत आपल्या मृत्यूची पुसटशी कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारांमध्ये आणि सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचाः दादरच्या फेरीवाल्यांना नियंत्रणात ठेवणाऱ्या निरीक्षकाचे हृदयविकाराने निधन!)
कोरोना काळात कर्मचा-यांचे वाढवले मनोधैर्य
शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून डॉ. मनिषा जाधव कार्यरत होत्या. मुख्य वैद्यकीय अधिकारी असल्या तरी त्यांचे प्रशासकीय कौशल्य चांगले होते. त्यामुळे परिचारिकांचा प्रश्न असो वा रुग्णालयातील इतर कामगार कर्मचाऱ्यांचा प्रश्न, आंदोलन होऊ न देता सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळेच प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे स्नेहाचे संबंध जोडले गेले होते. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा क्षयरोग रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात नव्हते, तरीही येथील ४५हून अधिक कर्मचारी बाधित निघाले. पण त्यावेळी संपूर्ण रुग्णालय या सर्व गोष्टींचा शोध घेत असतानाच सर्व कामगारांना विश्वासात घेऊन त्यांनी आधी त्यांचे मनोधैर्य वाढवले. पण त्याबरोबरच त्यांनी केईएम रुग्णालयातून कोरोना चाचणीचे किट मागवून रुग्णांची तपासणी केली. तेव्हा ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जी बाधा झाली, ती रुग्णांमुळेच होती. त्यामुळे त्यांनी पुढे प्रत्येक रुग्णांजवळ जाताना तसेच त्यांच्यावर उपचार करताना, कोरोनासदृश्य रुग्ण असे समजून काम करण्याचे निर्देश दिले. पुढे मग एकही कर्मचारी बाधित निघाला नाही, असा अनुभव म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितला.
रुग्णालय एका चांगल्या डॉक्टरला मुकले
मागील काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांच्यावर कांदिवलीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने आमचे क्षयरोग रुग्णालय खऱ्या अर्थाने एका चांगल्या डॉक्टरला मुकले, असे नारकर यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी फेसबूकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकून यापुढे आपली भेट होईल की नाही अशी त्यांनी कल्पना दिली होती. पण त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांना मृत्यूची कल्पना त्यांना आधीच आली होती असंच आम्हाला वाटू लागले आहे, असे रुग्णालयातील कर्मचारी म्हणाले.
Join Our WhatsApp Community