आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे, गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी व्हिपबाबत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना प्रश्न विचारले. मात्र त्या प्रश्नांची प्रभू यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला.
व्हॉट्सअपवर पाठवलेल्या व्हिपचे कुठेही पुरावे दिले नाहीत
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांसमोर जबाबात सुनील प्रभू यांची वेगवेगळी विधाने गोंधळात टाकणारी आहेत. त्यामुळे त्यांना नेमकी माहिती नाही हे दिसून येते. प्रश्न विचारल्यानंतर उत्तराची व्याप्ती वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रभू करत आहेत. व्हिपबाबत जो खुलासा त्यांनी दिला तो समाधानकारक वाटत नाही. मेल आणि व्हॉट्सअपवर पाठवलेल्या व्हिपचे कुठेही पुरावे दिले नाहीत. याबाबत पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. आरोप करणारेच दिरंगाई करताना दिसत आहेत. त्यातून ही सुनावणी आणखी लांबेल असा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप शिरसाट यांनी केला. तसेच सुनील प्रभू यांना त्या गोष्टीचे ज्ञान आहे की नाही, किंवा हे सगळे कागदपत्रे त्यांनी बनावटरितीने तयार केलेली आहेत. त्यामुळे प्रश्नाला उत्तरे देताना त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते नेमके उत्तर देणे टाळत आहेत. सुनील प्रभू यांनी ज्या व्हिपच्या आधारे अपात्रतेची (MLA Disqualification Case) मागणी केली तो व्हिपच मूळात बनावट आहे. तो कुणाला पोहचलाच नाही हे आम्ही वारंवार सांगतोय. या १६ आमदारांमध्ये माझेही नाव असल्याने मलाही तो व्हिप मिळाला नाही. आम्ही हे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग सगळीकडे सांगितले आहे. त्यामुळे आता या व्हिपबाबत खुलासा करताना सुनील प्रभू यांची दमछाक होत आहे, असेही शिरसाट यांनी म्हटले.
(हेही वाचा Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींना पनौती म्हणणे राहुल गांधींना पडले महागात; निवडणूक आयोगाने बजावली नोटीस)
Join Our WhatsApp Community