Udhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘सासुरवाडीला’ का जात नाहीत ?

आपल्याला येथे फारसा वाव नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाल्यामुळे त्यांनी कल्याण-डोंबिवलीकडे दुर्लक्ष केले असावे अशी चर्चा आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे आता सासुरवाडीला जात नाहीत असे बोलले जाते.

113
Udhav Thackeray : उद्धव ठाकरे 'सासुरवाडीला' का जात नाहीत ?
Udhav Thackeray : उद्धव ठाकरे 'सासुरवाडीला' का जात नाहीत ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर सोबत राहिलेल्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पक्ष बांधणीला सुरूवात केली. सरकारविरोधात रणशिंग फुंकत उद्धव ठाकरे राज्यातील वेगवेगळ्या भागांत दौरे काढत फिरत आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे भाजप आणि शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीत अजूनही फिरकले नसल्याने येथील ठाकरे निष्ठावंतांच्या गोटात अस्वस्थतेचे वारे वाहू लागले आहे. (Udhav Thackeray)

शिंदेंची पकड घट्ट

मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा असून भाजपच्या काही नेत्यांसोबत असलेले मतभेद मिटविण्याकडे शिंदे पिता-पुत्रांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे पुत्राला आव्हान देईल असा चेहरा कोण आणि त्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघात कराव्या लागणाऱ्या तयारीचे काय अशी संभ्रमावस्था सध्या ठाकरे गटात आहे. तर डोंबिवली ही उद्धव ठाकरे यांची सासुरवाडी आहे. त्यामुळे सासुरवाडीला यायला पण वेळ नाही का असा प्रश्नही डोंबिवलीकरांमध्ये उपस्थित होत आहे. (Udhav Thackeray)

बाळासाहेब ठाकरेंचे शहराशी नाते

कल्याण-डोंबिवली ही शहरे नेहमीच ठाकरे कुटुंबियांसाठी जवळची आणि जिव्हाळ्याची ठरली आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी या डोंबिवलीच्या माहेरवाशीण. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ कल्याणमध्ये वास्तव्य होते. कायमस्वरुपी निवासासाठी शिवसेनाप्रमुख मुंबईत आल्यानंतर त्यांचे कल्याण, डोंबिवली शहरांवर सतत लक्ष असायचे. दुरवस्था झालेल्या काळा तलावाचे सौंदर्यीकरण करुन घेण्यातही बाळासाहेबांचा मोठा पुढाकार होता .

डोंबिवलीकडे पाठ

डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी माहेरवाशीण रश्मी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियमित सूचना करत असत. ठाकरे कुटुंबीयांचे या शहरांवरील प्रेम, वास्तव्य यामुळे या भागातील नागरिक नेहमीच शिवसेनेशी घट्ट नाते ठेऊन राहीले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर ठाकरे कुटुंबियांनी देखील शहराकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची एक मोठी फळी अजूनही ठाकरे यांच्यासोबत आहे. असे असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच काय आदित्यही या शहरांमध्ये फिरकलेले नाहीत.

(हेही वाचा : Sudhir Mungantiwar : एवढा बाऊ कशाला! ‘त्या’ बॅनर बाबत मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण)

उमेदवारीबाबत अनिश्चितता

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडून कल्याण-डोंबिवलीतील आगामी लोकसभा, विधानसभा उमेदवार, निवडणुकीबाबत तयारी सुरू झाली आहे. असे असताना ठाकरे गटात मात्र शुकशुकाट आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची याची साधी चर्चाही अजून ठाकरे गटात नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळेल यासाठी कोणतेही प्रयत्न मातोश्रीवरुन होत नसल्याची उघड चर्चा आता स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आमच्या नियमित बैठका होतात. आम्हाला मार्गदर्शन केले जाते. चौक सभांच्या माध्यमातून केंद्र, राज्य सरकारकडून होणाऱ्या फसव्या घोषणांची माहिती लोकांना दिली जात आहे. आम्ही ठोस कार्यक्रम दिला नसल्याने वरिष्ठ नेते आले नाहीत’ असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. (Udhav Thackeray)

… म्हणून उद्धव ठाकरेंचे दुर्लक्ष?

कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण अर्थात येथे जास्त प्रभाव हा एकनाथ शिंदे यांचाच आहे. उद्धव ठाकरे नावापुरते शहरात जायचे, पण सगळा कारभार हा एकनाथ शिंदे हेच पाहत होते. शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर कल्याण-डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे बळही एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे शिंदे यांची येथील ताकद आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला येथे फारसा वाव नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाल्यामुळे त्यांनी कल्याण-डोंबिवलीकडे दुर्लक्ष केले असावे अशी चर्चा आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे आता सासुरवाडीला जात नाहीत असे बोलले जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.