Winter Session : नागपूरची थंडी बोचण्याआधीच परिपत्रक बोचले

कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे अखेर गृह विभागाकडून परिपत्रक रद्द

154
Winter Session : नागपूरची थंडी बोचण्याआधीच परिपत्रक बोचले
Winter Session : नागपूरची थंडी बोचण्याआधीच परिपत्रक बोचले

येत्या ७ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारी कर्मचारी आणि अधिकारी नागपुरातील गुलाबी थंडीत मद्याचे पेग रिचवत झणझणीत सावजी मटणावर यथेच्छ ताव मारून दुसऱ्या दिवशी हँगओव्हरमध्ये जातात. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात कर्तव्यावर हजर असताना सोबत गरम कपडे घेऊन खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि तब्येत सांभाळा, असा काळजीवजा सल्ला गृह विभागाने मंगळवारी खास परिपत्रक काढून आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला खरा, पण गृह विभागातूनच विरोध होताच तिसऱ्याच दिवशी हे परिपत्रक रद्द करण्याची पाळी गृह विभागावर आली आहे. (Winter Session)

तर्री खाऊ नका, तर्र होऊ नका सांगणेही बोचले

हिवाळी अधिवेशनाच्या कार्य काळात नागपुरात कमालीची थंडी असते. वातावरणात चांगलाच गारठा पडत असल्याने मुंबई व राज्याच्या इतर जिल्ह्यांमधून पोलीस बंदोबस्त अथवा शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या गृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागपूरचे गारठवणारे वातावरण सहन होत नाही. बोचऱ्या थंडीमुळे नाक बंद होऊन सर्दी, पडसे व खोकला लागतो. डोकेदुखी आणि कणकण जाणवत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. अंगातील थंडी पळवण्यासाठी काही शौकीन अधिकारी, कर्मचारी उशिरा रात्रीपर्यंत उंची मद्याचे पेग रिचवतात. नागपुरात प्रसिद्ध असलेल्या तर्रीदार सावजी मटण, चिकनवर मनसोक्त ताव मारतात. परिणामी दुसऱ्या दिवशी आरोग्याचे संतुलन बिघडून त्यांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. (Winter Session)

विधिमंडळ अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी सर्वच जिल्ह्यांमधून आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला जातो. नागपुरात सेवेवर हजर होताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना थंडीचा फारसा अंदाज लागत नाही. त्यामुळे अधिवेशन प्रारंभाच्या एक दोन दिवसात बंदोबस्तकामी थंडीत कुडकुडत बसण्याची पाळी त्यांच्यावर येते. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक गरम कपडेही नसतात. (Winter Session)

नागपूरच्या थंडीची ही परिस्थिती लक्षात घेऊन गृह विभागाने मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या निर्देशानुसार एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकात नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात कर्तव्यावर हजर होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागपूरच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करून आरोग्य जपण्याचा सल्ला देण्यात आला होता.गृह विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागपूरला बंदोबस्त वा इतर सरकारी सेवेसाठी हजर होताना तेथील वातावरणानुसार कपड़े घ्यावेत तसेच आपआपल्या गोळ्या-औषधे न चुकता बरोबर घेऊन जाव्यात, असे परिपत्रकात नमूद होते. नागपुरातील वास्तव्यात घरगुती जेवणाला पसंती द्यावी, बाहेरील मसालेदार जेवण घेऊ नये अथवा गृह विभागाच्या निर्देशाप्रमाणे भोजन घेऊन आरोग्य सांभाळावे, असा सल्ला देण्यात आला होता. प्रकृतीस अपायकारक ठरणारे खाद्यपदार्थ अथवा पेय घेऊ नये, असेही परिपत्रकात म्हटले होते. (Winter Session)

(हेही वाचा – DGCA Director Suspended : लाच म्हणून घेतले विमान; नागरी विमान महासंचालनालयाचे संचालक निलंबित)

परिपत्रक सर्वच विभागांसाठी काढले पाहिजे होते

दरम्यान, मंगळवारी जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकाला गृह विभागातूनच विरोध झाल्याने गुरुवारी सकाळीच हे परिपत्रक रद्द करण्यात आले. अधिवेशनात कर्तव्यावर हजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे परिपत्रक काढण्यात आले होते. खरे पाहता, सामान्य प्रशासन विभागाने सर्वच विभागांसाठी असे परिपत्रक जारी करायला हवे होते, अशी भावना गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली. (Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.