मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहत पुनर्विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या आश्रय योजनेंतर्गत आता अंधेरी पश्चिम येथील यारी रोड, ए.बी. नायर रोड, जुहू गल्ली तसेच सांताक्रुझ पश्चिम येथील न्यू हसनाबाद लेनमधील वसाहतींचाही विकास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून, वसाहतींची जागा रिक्त करुन दिल्यावर एका वर्षाच्या आत याठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या या सर्व ठिकाणी ३५० सदनिका असून, महापालिकेला सुमारे ११४०० सदनिका अपेक्षित होत्या. पण कंत्राटदार महापालिकेला तब्बल दोन हजारांहून अधिक सदनिका बांधून देणार आहे.
याठिकाणी कामे सुरू
सफाई कामगारांना चांगल्या सुसज्ज व हवेशीर मोकळ्या जागेत राहता यावे, यासाठी महापालिकेने कामगार वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम आश्रय योजनेंतर्गत हाती घेतले आहे. मुंबईत एकूण सफाई कामगारांच्या ४६ वसाहती असून त्यातील ३६ वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या सिध्दार्थ नगर, कोचिन स्ट्रीट आणि पॉवेल्स लँडसह दादर गौतम नगर, दादर कासारवाडी आणि टँक पाखाडी प्रकल्पांची कामे धिम्या गतीने सुरू आहेत.
इतक्या सदनिकांची बांधणी केली जाणार
महापालिकेच्या एच/पश्चिम अर्थात सांताक्रुझ पश्चिम येथील न्यू हसनाबाद लेन येथे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचेयै पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी यापूर्वीच कंत्राटदार नेमला आहे. याचे कामही अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. या पहिल्या टप्प्यात १५ मजल्यांच्या दोन विंगमध्ये १२० सदनिका बांधल्या जाणार आहेत. आता प्रशासनाने याच हसनाबाद लेनमधील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या दोन्ही टप्प्यात ३०० चौरस फुटाच्या ७६० सदनिका आणि ६०० चौरस फुटाच्या १४४ सदनिका बांधल्या जाणार आहेत. या व्यतिरिक्त यारी रोडला ३०० चौरस फुटाच्या ३२६, नायर रोडला १९६, जुहू गल्लीत ५६२ आणि ६०० चौरस फुटाच्या ५८ सदनिका बांधल्या जाणार आहेत. सफाई कामगारांच्या चार वसाहतींच्या जागी पुनर्विकास करुन ३०० चौरस फुटाच्या १८४४ तर ६०० चौरस फुटाच्या १४४ अशा स्वरुपाच्या एकूण १९८८ सदनिकांची बांधणी केली जाणार आहे.
(हेही वाचाः प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालय बंद, कोविड केंद्रावरच मुलुंडकरांची मदार!)
डिझाईन आणि बिल्ड टर्नकीच्या धर्तीवर महापालिकेच्या क्षेत्रफळावर कंत्राटदारामार्फत आराखडे, स्थापत्य, विद्युत परिचालन व परिरक्षण या कामांसाठी कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. या वसाहतींचा जलदगतीने पुनर्विकास करण्यासाठी आश्रय योजनेंतर्गत पूर्व निर्मिती तंत्रज्ञान(प्रिहॅब टेक्नॉलॉजी) वापरुन प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवला जात आहे.
अंधेरी पश्चि यारी रोड
भूखंडाचे क्षेत्रफळ : २७३० चौरस मीटर
विद्यमान सदनिका : ४३
प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : ३२६
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ०००
अंधेरी पश्चिम ए बी नायर रोड
भूखंडाचे क्षेत्रफळ : १३५० चौरस मीटर
विद्यमान सदनिका : ३६
प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : १९६
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ०००
(हेही वाचाः कोरोना वाढतोय, महापालिकेचे चुकतंय कुठे?)
अंधेरी पश्चिम जुहू गल्ली
भूखंडाचे क्षेत्रफळ : ४४९७ चौरस मीटर
विद्यमान सदनिका : ५७
प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका :५६२
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ५८
सांताक्रुझ पश्चिम न्यू हसनाबाद लेन
भूखंडाचे क्षेत्रफळ : ११,८०७ चौरस मीटर
विद्यमान सदनिका : २१४
प्रस्तावित ३०० चौ.फुटाच्या सदनिका : ७६०
प्रस्तावित ६०० चौ. फुटाच्या सदनिका : ८६
प्रकल्पाचा एकूण कंत्राट खर्च : सुमारे ४६० कोटी रुपये
तिन्ही ठिकाणच्या कामांसाठी नियुक्त केलेली कंपनी : मेसर्स ट्रान्सकॉन शेट क्रिएटर्स
Join Our WhatsApp Community