तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान सीबीआयला दिलेला चौकशीचा कालावधी सोमवारी, २० एप्रिल रोजी पूर्ण झाला आहे.
सात जणांचा जबाब नोंदवला!
या दरम्यान सीबीआयने तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे, एसीपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे दोन स्वीय सहायक पालांडे आणि कुंदन असे एकूण सात जणांची यामध्ये चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
(हेही वाचा : अखेर मंत्री शिंगणेंनी सरकारचे तोंड फोडले ! प्रविण दरेकरांची टीका)
अहवाल विधी विभागाला सुपूर्द!
सीबीआयकडून या प्रकरणाचा अहवाल तयार करून सीबीआयच्या विधी विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालबाबत सीबीआयचे संचालक विधी विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून मिळाली.
पथकातील एकाला कोरोनाची लागण!
या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे ६ते ७ जणांचे पथक मुंबई दाखल झाले होते. सोमवारी हे पथक या प्रकरणाची चौकशी संपवून त्यांचा अहवाल विधी विभागाकडे सोपवून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दिल्ली येथे दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाची विमानतळावर तपासणी करण्यात आली असता त्यापैकी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून त्यांना अलगिकरण करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community