अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्याशी खलिस्तान (Khalistan) समर्थकांनी गैरवर्तन केले. वास्तविक संधू गुरुपूरब साजरे करण्यासाठी न्यूयॉर्कमधील लॉंग आयलँड गुरुद्वारामध्ये पोहोचले होते. तिथे खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्यावर निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला. तुम्ही पन्नूला मारण्याचा कट रचला असे एक खलिस्तानी म्हणताना ऐकू येत आहे.
संधूंसोबतच्या गैरवर्तनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तरनजीत सिंग संधू संपूर्ण घटनेदरम्यान पूर्णपणे मूक दिसत आहे. तर गुरुद्वारामध्ये उपस्थित काही लोक खलिस्तान समर्थकांना मागे ढकलताना दिसत आहेत. खलिस्तानींनी गुरुद्वारामध्ये भारताविरोधात घोषणाबाजी केली. तरनजीत सिंग संधू गुरुद्वारातून बाहेर पडू लागले तेव्हा एका आंदोलकाने तेथे खलिस्तानी (Khalistan) ध्वज फडकावला. अमेरिकेत दहशतवादी पन्नूला ठार मारण्याचा कट भारताने रचला होता, मात्र तो तेथील प्रशासनाने हाणून पाडल्याचा दावा नुकत्याच प्रसारमाध्यमांनी केला होता. या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. हिम्मत सिंग नावाच्या व्यक्तीवर न्यूयॉर्कच्या गुरुद्वारामध्ये संधूविरोधात आंदोलन आयोजित केल्याचा आरोप आहे.
गुरुद्वारातील हाणामारीनंतर संधूंनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी घटनेचा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यांनी लिहिले की लाँग आयलंडमधील स्थानिक संगतीत सहभागी होऊन छान वाटले. कीर्तन ऐकले आणि गुरु नानकांच्या एकता, समतेच्या संदेशाविषयी सांगितले. खलिस्तानी (Khalistan) समर्थकांनी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याची 60 दिवसांतील ही दुसरी घटना आहे. संधू यांच्या आधी सप्टेंबरमध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशीही स्कॉटलंडमधील ग्लासगो गुरुद्वारात गैरवर्तन करण्यात आले होते. अशा वाढत्या घटनांचा भारताने निषेध केला आहे.
Join Our WhatsApp Community