२० वर्षीय अग्निवीर तरुणीने प्रशिक्षणादरम्यान गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नौदलाच्या आयएनएस हमला येथील महिला वसतीगृहात घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी या तरुणीने प्रेमप्रकरणातून हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपर्णा नायर असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या रूमपार्टनरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती तिच्या खोलीत परतली आणि वारंवार दार ठोठावले तेव्हा नायरने प्रतिसाद दिला नाही. नंतर तिने इतर मुलींना आणि वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली, त्यांनी दरवाजा तोडला आणि तेथे नायरचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, त्यांनी मुलीची तपासणी करून तिला मृत घोषित केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णाचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि त्यात दुरावा निर्माण झाल्यामुळे तिने बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तथापि, या प्रकरणाशी संबंधित तिच्या प्रियकराची चौकशी किंवा अटक झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
(हेही वाचा – Legislative Winter Session : अधिवेशन तोंडावर आहे, जरा सतर्कतेने काम करा)
काय आहे अग्निवीर योजना
अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांसाठी अग्निवीर हा शब्द वापरला जातो. ही योजना १४ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती. अग्निपथ योजना ही लष्करात सेवा करण्याचा एकमेव मार्ग आहे. योजनेंतर्गत, सैनिक चार वर्षे सेवा देतात, ज्यामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि ३.५वर्षे तैनाती समाविष्ट असते. निवृत्तीनंतर ते सशस्त्र दलात कार्यरत राहण्यासाठी अर्ज करू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community