मुंबईतील वाढत्या कोविड रुग्णांमुळे महापालिकेच्या रुग्णलयांसह कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचारी हैराण झाले आहेत. एका बाजूला कोविड रुग्णांना दाखल करुन घेण्याची घाई, दुसरीकडे नॉन कोविड रुग्णांचीही धावपळ, यामुळे डॉक्टरांची अवस्था आता फार बिकट झाली आहे. त्यामुळे आपण शिफारस केलेल्या रुग्णाकडे डॉक्टर वेळीच लक्ष देत नाहीत, यातून आता डॉक्टर आणि नगरसेवक यांच्यात ‘तू तू-मै मै’ होऊ लागली आहे. याच कारणातून नगरसेविकेने अपशब्द वापरल्याने मंगळवारी दुपारी बोरीवली भगवती रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले. पण सेनेच्या नगरसेविकेकडून ही चूक झाली असली, तरी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांची माफी मागून पुन्हा दोन तासांमध्ये हे आंदोलन मागे घ्यायला लावले.
काय घडला नेमका प्रकार?
बोरीवली भगवती रुग्णालयात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉक्टरांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. एका रुग्णाला दाखल करुन घेण्यास विलंब झाल्यामुळे, एका महिलेने अर्वाच्च भाषा वापरल्याने, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह या डॉक्टरांनी हे आंदेालन पुकारले होते. मात्र, ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून शिवसेना नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी या आहेत. या आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक आमदार मनिषा चौधरी, नगरसेवक जगदीश ओझा, हरिष छेडा हे त्याठिकाणी पोहोचले. त्यानंतर खासदार गोपाळ शेट्टी आणि पोलिस उपायुक्तही तिथे पोहोचले. यावेळी घडलेला प्रकार चुकीचा असून, सध्या कोविड रुग्णांवर वेळीच उपचार होणे आवश्यक आहेत, त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घ्यावे. झालेल्या प्रकाराबाबत आम्ही सर्व लोकप्रतिनिधी माफी मागतो, अशी विनवणी त्यांनी केली. खुद्द पोलिस अधिकाऱ्यांनीही माफी मागून आपण स्वत: याठिकाणी पोलिस संरक्षण देतो, असे आश्वासन दिले. त्यामुळे साडेसहा वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि डॉक्टरांनी पुन्हा रुग्णसेवेला सुरुवात केली.
(हेही वाचाः नाशिक दुर्घटनेवर महाराष्ट्र शोकमग्न! मुख्यमंत्र्यांकडून भावना व्यक्त)
काय म्हणाल्या संध्या दोशी
यासंदर्भात शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी झालेला प्रकार हा केवळ रुग्णाला तातडीने दाखल करुन घेण्यासाठी घडलेला आहे. माझ्या परिचयाच्या एक रुग्ण आहेत, ज्यांना ह्दयविकाराचा आजार आहे. त्यांच्यासाठी मी भगवती रुग्णालयाच्या अधिक्षकांशी बोलणी करुन एक खाट रिकामी ठेवण्यास सांगितले. ती खाट रिकामी झाल्यांनतर आम्ही रुग्णाला तिथे हलवले. पण रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टर त्या रुग्णाकडे पाहण्यासच तयार नव्हते. या दरम्यान त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली. म्हणून त्यांच्या पत्नीने मला पुन्हा फोन केला. मी ताबडतोब भगवती रुग्णालयात धाव घेतली.
मागितली माफी
मी रुग्णाची प्रकृती पाहून डॉक्टरांना विचारणा करत त्यांना फैलावर घेतले. तेव्हा व्हिलचेअरवरच त्यांना ऑक्सिजन लावले. त्यानंतर मी अधीक्षकांना भेटून याची कल्पना दिल्यांनतर, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करुन घेतले. तोपर्यंत हेच डॉक्टर, सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत तिथे पोहोचले. तेव्हा मी नगरसेविका असल्याचे त्यांना कळले आणि झाल्या प्रकाराबाबत आम्ही दोघांनीही एकमेकांची माफी मागितली. त्यानंतर राजकीय वळण लागले. त्यामुळे जो प्रकार घडला होता तो केवळ रुग्णाला दाखल करुन घेण्याच्या भावनेने घडला होता. त्यात डॉक्टरांच्या भावना दुखवण्याचा प्रकार नव्हता. त्याच भावनेत मी काही बोलले असेन, तर मी पुन्हा एकदा त्यांची माफी मागते, असे त्या म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community