धावत्या लोकलमधून पडणे, लोकलमधील गर्दी, उतरताना धक्काबुक्की होणे…इत्यादी कारणांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरिता लोकलमधील गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी आता टपाल मुख्यालयानेही पुढाकार घेतला आहे. उपनगरी रेल्वेगाड्यांमधील गर्दीच्या विभागणीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई (Mumbai) विभागाकडून पर्यायी उपाययोजना करण्यात आल्यानंतर सरकारच्या दुसऱ्या यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.
वाढत्या गर्दीमुळे लोकल प्रवासांत होणारे अपघात, यामुळे होणाऱ्या मृत्यूला आळा घालण्यासाठी १ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. वेळेत बदल करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून ५००हून अधिक आस्थापनांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. याअंतर्गत मंत्रालयासह सरकारी आणि खासगी कार्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्या, आस्थापना यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – India South Africa Tour : रोहित, विराटला टी-२० तसंच एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती, कसोटी संघातून अजिंक्य रहाणेला वगळलं)
या पत्र व्यवहाराला मुंबई टपाल कार्यालयाने प्रतिसाद दिला आहे. रेल्वेमधील गर्दी व्यवस्थापनासह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल करण्यास टपाल कार्यालय तयार आहे, असे मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगत असलेल्या टपाल कार्यालयातील डिलिव्हरी संबंधित कर्मचारी सकाळी लवकर अर्थात साडेसहा-सातच्या सुमारास येतात. खिडक्यांवरील कर्मचारी साडेनऊपर्यंत पोहोचतात. यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळबदलाचा पर्याय देण्यात येणार आहे, अशी माहिती टपाल सेवेच्या महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल किशन कुमार शर्मा यांनी दिली आहे.
(हेही वाचा – India South Africa Tour : रोहित, विराटला टी-२० तसंच एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती, कसोटी संघातून अजिंक्य रहाणेला वगळलं)
कार्यालयीन वेळबदलाचा उपाय
मुंबई टपाल कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६००पर्यंत आहे. यापैकी २०० कार्यालयीन कर्मचारी असून त्यांना वेळबदलाचा पर्याय देण्यात येणार आहे. सध्या साडेनऊ ते सहा नियमित कामकाजाची वेळ आहे. सध्याच्या वेळेच्या एक ते दीड तास आधी किंवा सकाळी ११ वाजल्यापासून पुढे असे पर्याय देण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. मुंबई लोकलमधील गर्दी व्यवस्थापनासाठी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्वप्रथम कार्यालयीन वेळबदलाचा उपाय सुचवला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community