आपल्या आजूबाजूला, समाजात, नातेवाईकांमध्ये, मित्र-मंडळीत जर कोणी एचआयव्ही बाधित रुग्ण असेल, तर त्यांना वाळीत टाकू नका. त्यांना मार्गदर्शन करा. या आजाराविषयी त्यांच्या मनात असलेली भीती घालवा. कारण त्यांनाही आपल्यासारखे सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थाद्वारा आयोजित ‘स्वयंम महिला मेळा २०२३’मध्येही आपण या रुग्णांना सोबत घेऊन आनंदी जीवन जगण्याचा संकल्प करू, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) तथा मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक रमाकांत बिरादार यांनी केले. मुंबई महानगरपालिका स्थापित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारा शुक्रवारी १ डिसेंबर २०२३ जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त ‘स्वयंम महिला मेळा २०२३’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बिरादार बोलत होते. (World AIDS Day)
यावेळी ‘एफ उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक (प्रभारी) डॉ. विजयकुमार करंजकर, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या उप संचालक ज्ञानेश्वरी सोनवणे आदी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. (World AIDS Day)
उपायुक्त बिरादार म्हणाले, एचआयव्ही बाधितांना समाज प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था उत्तम काम करीत आहे. यंदाच्या मेळाव्याचे ब्रिदवाक्य ‘समुदायाला नेतृत्व करू द्या’ असे आहे. त्यानुसार या रुग्णांना समाजात सामावून घ्या. एचआयव्ही बाधितांसाठी या संस्थेद्वारे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे महाराष्ट्रात आणि देशात अनुकरण केले जाते. सन २००३ पर्यंत परिस्थिती वेगळी होती. तेव्हा जर कोणाला एचआयव्ही झाला तर तो पूर्ण हताश होत असे. मात्र आता मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेसह इतर काही संघटना, संस्था तसेच महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता सन २०२३ मध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. (World AIDS Day)
आज समाजात अनेक रुग्ण वेळेवर औषधोपचार करून आनंदात जीवन जगत आहेत. समाज माध्यमांवरही या आजाराबाबत जनजागृती सुरू असल्याने रुग्णांना आधार मिळतो. बचत गटाच्या माध्यमातूनही या रुग्णांना रोजगार मिळत असल्याचे येथील स्वयंम महिला मेळ्यातून सिद्ध होत आहे. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेने हाती घेतलेले आनंद मेळा, उमेद मेळा, सखी मेळा, सामाजिक सुरक्षा योजना शिबिर आदींचा या घटकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास बिरादार यांनी व्यक्त केला. (World AIDS Day)
सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित रुग्णांना खचून न जाता आनंदाने जगण्याचा सल्ला दिला. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सन २००३ मध्ये मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या उपसंचालक असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. समाजातील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी सांगून समाधान व्यक्त केले. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेला रुग्णांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला. सायन रुग्णालयाचे डॉ. नितीन कर्णिक यांनी रुग्णांना औषधोपचाराबद्दल माहिती दिली. (World AIDS Day)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : अमित शहांनी सांगितलंय, शिंदे गट लोकसभेच्या १३ जागा लढवणार; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक (प्रा) डॉ. विजयकुमार करंजकर यांनी केले. त्यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मितवा’, ‘अनुबंध’, ‘पॉझिटिव्ह स्पिकर्स’, ‘रेड रिबन क्लब’, ‘फ्लॅश मॉब’, ‘रेड रन मॅरेथॉन’, ‘नो युअर स्टेटस’, आदींबाबत चित्रफितीद्वारे माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपसंचालक ज्ञानेश्वरी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेतर्फे येत्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची डिजिटल पद्धतीने बझर दाबून सुरुवात करण्यात आली. यावेळी एचआयव्ही बाधित रुग्णांना संस्थेच्या आवारात लावलेल्या विविध स्टॉल्सला मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमात रुग्णांची आरोग्य तपासणी, औषधांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात गायक नचिकेत, गायिका दीपाली यांनी सदाबहार मराठी आणि हिंदी गीते सादर करून उपस्थित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. यावेळी विविध स्पर्धादेखील घेण्यात आल्या. कार्यक्रमाला उपस्थित एचआयव्ही बाधित महिलांनी आपले अनुभव कथन केले. (World AIDS Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community