Temple : 550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेला सुरुवात

394

देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्‍यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील (Temple) विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे पुजार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे. वर्ष 1760 मध्ये अब्दालीने या इस्लामी आक्रमकाने भारतावर आक्रमण केले, तेव्हा मथुरेतील मंदिराच्या रक्षणासाठी नागा साधूंनी निकराचा लढा दिला. या लढाईत 10 हजार नागा साधू मारले गेले. यावरून प्राचीन काळापासून धर्मासाठी लढण्याचा हा आपला इतिहास आहे. यानंतरच्या काळात हिंदु धर्म आणि मंदिर यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाशी झुंज दिली. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठीच आपला जन्म झाला आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्याचा प्रण घ्या, असे आवाहन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत केले.

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आणि 3 डिसेंबर यादिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ होत आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी 550 हून अधिक मंदिर प्रतिनिधी उपस्थित होते.

ओझर येथील श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानचे विद्यमान विश्वस्त बबनराव मांडे यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले, तर महाराष्ट्र मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी मांडला. घनवट या प्रसंगी म्हणाले, ‘‘मंदिर विश्वस्तांचे अधिवेशन सद्यस्थितीत राज्यव्यापी झाले आहे. धर्मकार्यात विश्वस्तांचा असाच सहभाग लाभला, तर पुढील मंदिर-न्यास परिषद राष्ट्रीय पातळीवर घ्यावी लागेल. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमधील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानात घुसून धर्मांनांनी भाविकांना मारहाण केली. यापूर्वी मंदिरांसाठी कुणी वाली नव्हता; परंतु आता मंदिर विश्वस्त संघटित झाले आहेत. यापुढे या संघटनेच्या माध्यमातून मंदिरांच्या समस्या सोडवल्या जातील.’’

(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)

देवतांचा सन्मान न झाल्यास विज्ञानालाही पराजय मान्य करावा लागतो  –  रमेश शिंदे

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले, ‘‘देवतांचे सन्मान न झाल्यास विज्ञानालाही पराजय मान्य करावा लागतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे उत्तराखंड येथील बोगद्यामध्ये अडकलेले 41 मजूर सुरक्षितपणे बाहेर येणे होय. बोगद्याचे काम चालू असताना तेथील बाबा बौखनाथ नाग यांचे मंदिर पाडण्यात आले; मात्र 3 वर्ष उलटूनही त्याची पुनर्स्थापना झाली नाही. ऑस्ट्रेलिया येथून आलेले बोगदातज्ञ डिक्स यांनीही बाबा बौखनाथ नाग यांना शरण जाऊन, प्रार्थना करून त्यांच्या कामाला प्रारंभ केल्यानेच त्यांना यश आले. त्यामुळे वैज्ञानिकांनाही देवाला शरण जावे लागले. भारतातील राज्यघटनेचा अनुच्छेद 25 हे धर्मस्वातंत्र्यांचा, तर अनुच्छेद 26 हे धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य देते. सर्वाेच्च न्यायालयाने मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात निकाल दिलेला असतांनाही राज्य सरकारे हिंदु मंदिरांचे (Temple) नियंत्रण स्वत:कडे ठेवत आहे, तरी या सरकारीकरणाच्या विरोधात आपल्याला लढ्याची तीव्रता वाढवावी लागेल. मंदिर विश्वस्तांनी भरताप्रमाणे सेवेचा दृष्टीकोन ठेवून कार्य केले पाहिजे.

विकास करतांना मंदिराची मूळ रचना वाचवणे आवश्यक  – विलास वहाणे

मंदिरांचा विकास करतांना मंदिराची (Temple) मूळ रचना वाचवणे आवश्यक असते. मंदिरांची दुरुस्ती करतांना, जीर्णाेद्धार करतांना मंदिराच्या बांधकाम शैलीचा अभ्यास करणेही आवश्यक आहे. मंदिरात ‘टाइल्स’ बसवल्यामुळे मूळ दगडापर्यंत हवा पोहोचत नसल्यामुळे काही वर्षांनंतर दगडांची झीज होते. सध्या मूर्तीवर वज्रलेप करण्याच्या नावाखाली रासायनिक घटक वापरले जात आहेत. ते अत्यंत चुकीचे आहे. मंदिरांचे संवर्धन करतांना मूळ मंदिर आणि देवतेची मूर्ती यांना कोणतीही इजा न पोचता ते काम व्हायला हवे. तरच मंदिरातील भगवंताचा वास टिकून रहातो, असे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक विलास वहाणे यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात मंदिर सुव्यवस्थापन, तसेच पुजार्‍यांच्या समस्या आणि उपाययोजना यांवर परिसंवाद झाला. यानंतरच्या सत्रात ‘झी’ 24 चे संपादक नीलेश खरे यांचे ‘मंदिर आणि मिडिया मॅनेजमेंट’, तर माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांचे ‘धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मंदिरे यांचा समन्वय’ या संदर्भात मार्गदर्शन झाले.

प्रारंभी ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थानचे विश्वस्त बबनराव मांडे, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे शंकर ताम्हाणे, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे कार्यकारी अध्यक्ष  मधुकर अण्णा गवांदे, तुळजापूर येथील सिद्धगरीबनाथ मठाचे योगी पू. मावजीनाथ महाराज, नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे (Temple) श्री महंत सुधीरदासजी महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, अमरावती येथील श्री महाकाली शक्तीपीठाचे पिठाधिश्वर श्री शक्तीजी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच रत्नागिरी येथील जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘अँड्रॉइड’, तसेच ‘आय.ओ.एस्’ प्रणालीवरील ‘सनातन पंचांग 2024’चे लोकार्पण करण्यात आले, तसेच लेखक श्री. दुर्गेश परूळकर यांनी लिहिलेल्या ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.