मध्यप्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि राजस्थान (Rajasthan) सोबतच तेलंगाणा (Telangana) विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. यामध्ये तेलंगाणात या वेळी मोठा बदल दिसून येत आहे. २०१३ मध्ये तेलंगाणाची स्थापना झाल्यापासून ही तिसरी निवडणूक आहे. गेल्या २ वेळा मुख्यमंत्री राहिलेले भारत राष्ट्र समितीचे (Bharat Rashtra Samithi) के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांना या वेळी काँग्रेसने कडवी टक्कर दिली आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासून सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीवर आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या आलेल्या आकडीवारीनुसार, ६२ जागांवर काँग्रेसने (Congress) आघाडी घेतली आहे. तर बीआरएस (BRS) ३९ जांगावर आघाडीवर आहे. भाजपा (BJP) ७ जागांवर, तर एमआयएम (MIM) ४ जागांवर सध्या आघाडीवर आहे.
दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले केसीआर (KCR) यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. केसीआर यांच्या पराभवाच्या कारणांची आता चर्चा चालू आहे. त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल असल्याचे मानले जाते. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला (BRS) ८८ जागांवर विजय मिळाला होता. तर काॅंग्रेसला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी मात्र जागा अर्ध्याने खाली आल्याचे चित्र आहे.
काय आहेत पराभवाची कारणे
राष्ट्रीय राजकारणाकडे कल भोवला ?
- गेली काही वर्षे के. चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये, KCR यांनी राष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नाव TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) बदलून BRS (भारत राष्ट्र समिती, Bharat Rashtra Samithi) केले.
- तेलंगणाच्या निवडणुकीला वर्षभराहून कमी कालावधी शिल्लक होता. तेव्हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपा राज्यात केसीआर यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात व्यस्त असतांना केसीआर ७००-७०० वाहनांच्या ताफ्यासह तेलंगाणा सोडून महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्रात त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून स्वत:ची राष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात संपूर्ण तेलंगाणाचे मंत्रिमंडळही त्यांच्यासोबत होते.
- राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल आणि तेलंगाणासोडून इतर राज्यांत घालवलेला वेळ यांची केसीआर यांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे, अशी चर्चा आता राजकीय विश्लेषकांमध्ये चालू आहे.
लांगूलचालनाला कंटाळली जनता
तेलंगाणामध्ये मुसलमानांची मते निर्णायक आहेत. तेथे एमआयएमसारखा कट्टर इस्लामी पक्षही आहे. त्यामुळे काॅंग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम यांच्यात मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्पर्धा चालू असते. त्यातही राज्यात सत्ताधारी असल्यामुळे बीआरएसने शासकीय स्तरावर तुष्टीकरणात आघाडीच घेतली होती.
- * तेलंगाणा सरकार गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ७ सहस्र इमामांना ५ सहस्र रुपये मानधन देत आहे. जुलै २०२२ मध्ये इमाम आणि मौलवी यांचे ३ मासांचे प्रलंबित मानधन देण्यासाठी तेलंगाणा सरकारने १७ कोटी रुपये संमत केले आहे.
- तेलंगाणामध्ये रमझान मासाच्या काळात सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणार्यांना २५ टक्के सवलत दिली गेली होती.
- के. चंद्रशेखर राव यांनीच गेल्या वर्षी ‘भाजपमधील नेते हे मूर्खांचा समूह असून भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा’, असे संतापजनक विधान केले होते.
- भाजपच्या द्वेषापोटीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तेलंगाणामध्ये गेले असतांना त्यांच्या स्वागतासाठी के. चंद्रशेखर राव हे ३ वेळा अनुपस्थित राहिले होते.
- हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह (T Rajasinh) यांनाही तेथील सरकारकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असतो. भाजप नेत्यांवरही अनेक आक्रमणे होत आहेत.
- बोधन (तेलंगाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासही तत्कालीन तेलंगाणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंसक विरोध केला होता.
तेलंगाणा राष्ट्र समितीच्या राजकारणाचा पाया पहिल्यापासूनच मुसलमानांच्या तुष्टीकरणावर आधारलेला आहे. तेलंगाणामध्ये मुसलमानांचे वर्चस्व आहे. वास्तविक तेलंगाणामध्ये हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के आहे आणि मुसलमान लोकसंख्या १२.६ टक्के आहे. याचा के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांना विसर पडला होता. या वेळी जनतेने मतपेटीद्वारेच हिंदूंच्या टक्केवारीची आठवण बीआरएसला करून दिली आहे, असेही म्हणता येईल. (BRS Telangana )
Join Our WhatsApp Community