- नित्यानंद भिसे
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांपैकी (Assembly Election 2023 Result) मिझोराम वगळता राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल रविवार, ३ डिसेंबर रोजी जाहीर झाला. एक्झिट पोलमध्ये भाजपाला या निवडणुकीत अपयश येणार असल्याचे वर्तवले जात होते, परंतु प्रत्यक्ष जेव्हा निकाल जाहीर होऊ लागले तेव्हा मात्र भाजपने तीन राज्यांत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली. या तीन राज्यांत भाजपने नुसता विजयच मिळवला नाही, तर मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत वाढ केली आहे.
मध्यप्रदेशात भाजपच्या मतांमध्ये ८ टक्क्यांनी वाढली
मध्यप्रदेशात २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या, त्यावेळी काँग्रेसच्या पारड्यात ४०.८९ टक्के मते पडली होती. मात्र त्याच वेळी भाजपच्या पारड्यात ४१.०२ टक्के मते पडली होती आणि भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या. मात्र वर्षभरात ऑपरेशन लोटस केल्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसचे सरकार कोसळले आणि भाजपचे सरकार आले होते.
२०२३च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2023 Result) भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपच्या पारड्यात ४८.६९ टक्के मते पडली आहेत, तर काँग्रेसच्या टक्केवारीत १ टक्क्यांनी घट होऊन काँग्रेसच्या पारड्यात ४०.४४ टक्के मते पडली आहेत.
राजस्थानात भाजपाला स्पष्ट बहुमत; काँग्रेसला नुकसान
राजस्थानात २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला १०० जागा मिळाल्या होत्या, त्यावेळी काँग्रेसच्या पारड्यात ३९.३० टक्के मते पडली होती. मात्र त्याच वेळी भाजपच्या पारड्यात ३८.७७ टक्के मते पडली होती आणि भाजपने ७३ जागा जिंकल्या होत्या. मात्र वर्षभरात काँग्रेसच्या कारभाराचा नकारात्मक परिणाम झाला आणि भाजपचे वर्चस्व वाढल्याचे दिसले.
२०२३च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. या ठिकाणी भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपच्या पारड्यात ४१.७७ टक्के मते पडली आहेत, तर काँग्रेसच्या टक्केवारीत १ टक्क्यांनी घट होऊन काँग्रेसच्या पारड्यात ३९.५३ टक्के मते पडली आहेत.
छत्तीसगडमध्ये भाजपच्या पारड्यात ४६.३१ टक्के मते
छत्तीसगडमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ६८ जागा मिळाल्या होत्या, त्यावेळी काँग्रेसच्या पारड्यात ४३ टक्के मते पडली होती. मात्र त्याच वेळी भाजपच्या पारड्यात ३३ टक्के मते पडली होती आणि भाजपने अवघ्या १५ जागा जिंकल्या होत्या. मात्र नक्षलीप्रभावित राज्यात केंद्र सरकारने जोरदार विकासकामे केली, आदिवासींना सुरक्षा दिली, त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसची या राज्यातून सत्ता गेली.
२०२३च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2023 Result) भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. या ठिकाणी भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपच्या पारड्यात ४६.३१ टक्के मते पडली आहेत, तर काँग्रेसच्या टक्केवारीत १ टक्क्यांनी घट होऊन काँग्रेसच्या पारड्यात ४२.१४ टक्के मते पडली आहेत.
तेलंगणात भाजपच्या मतांच्या टक्केवारी १०० टक्क्यांनी वाढ
तेलंगणात २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. टीआरएसला ८८ जागा मिळाल्या होत्या, त्यावेळी टीआरएसच्या पारड्यात ४६.८७ टक्के मते पडली होती. मात्र त्याच वेळी भाजपच्या पारड्यात ६.९८ टक्के मते पडली होती. काँग्रेसला २८.४३ टक्के मते पडली होती. भाजपने अवघी १ जागा जिंकली होती तर काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या.
२०२३च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2023 Result) भाजपने तेलंगणाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या. मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका केली. टीआरएसच्या भ्रष्टाचारी राजकारणावर टीका केली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारी तब्बल १०० टक्क्यांनी वाढ झाली. यावेळी भाजपाला १३.८२ टक्के मते पडली. तर टीआरएसची टक्केवारी ११ टक्क्यांनी घसरून ३९.५५ झाली, काँग्रेसची १० टक्क्यांनी वाढून ३९.५५ टक्के झाली.