PM Narendra Modi : सिंधुदुर्ग हे छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रतीक; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

223

सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला पाहून आपला उर अभिमानाने भरुन येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचे महत्व पटले होते. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो त्याला सत्ता राखता येते हे त्यांना माहीत होते. हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे या वीरांनाही मी वंदन करतो. छत्रपती शिवजी महाराजांची प्रेरणा घेऊन गुलामीची मानसिकता सोडून भारत देश प्रगती करतो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

भारताचा इतिहास गौरवशाली 

मी स्वतःला भाग्यवान समजतो की नौदलाच्या झेंड्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेशी जोडण्याची संधी मला मिळाली. मला आज एक आणखी घोषणा करायची आहे, भारतीय नौदल आता रँक्सची नावं आपल्या परंपरेप्रमाणे देणार आहे. नारीशक्तीची संख्या वाढवण्यावरही आपण भर देत आहोत. नेव्हल शिपमध्ये पहिल्या महिला कमांडिंग अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. आजचा भारत हा आपल्यासाठी नवी लक्ष्यं ठरवतो आहे ही खूप चांगली बाब आहे. एक मोठी ताकद भारताच्या मागे आहे आणि ती ताकद १४० कोटी लोकांच्या विश्वासाची ताकद आहे. भारताचा इतिहास हा एक हजार वर्षांच्या गुलामीचा इतिहास नाही, फक्त हार आणि निराशा यांचा इतिहास नाही. भारताचा इतिहास विजय, शौर्य, ज्ञान आणि विज्ञान यांचा इतिहास आहे. आपल्या समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे. एक काळ असा होता की ज्या काळात सुरतच्या किनाऱ्यावर ८० हून जास्त देशांची जहाजं असायची. विदेशांतून जेव्हा हल्ले झाले तेव्हा आपल्या शक्तींवर हल्ले केले गेले. आपली कला, कौशल्य विदेशी हल्ल्यांनी ठप्प केले होते. जेव्हा आपण समुद्रावरचे नियंत्रण घालवले तेव्हा आर्थिकदृष्ट्याही आपण कमकुवत झालो. आता आपल्या देशाला गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) म्हटले. शिवरायांनी कमावलेली नौदलाची शक्ती आपण परकिय आक्रमणांमुळे गमावली, आता ती पुन्हा मिळवायची आहे असेही ते म्हणाले.

(हेही वाचा Prashant Kishor : चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला कोणते दिले सल्ले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.