मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांसह वंचित दुर्बल घटकांतील लोकांचेही प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या घटकातील तृतीयपंथी समाजातील लोकांचे प्रचंड हाल होत होते. त्यांची ही समस्या हिंदुस्थान पोस्टने मांडल्यानंतर, मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेत भांडुप सोनापूर येथील ४० तृतीयपंथीयांना महिन्याभराचे रेशनचे किट खासगी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले. या समाजासाठी कार्यरत असणाऱ्या देवामृत फाऊंडेशनच्या प्रिया जाधव यांनी या समाजाला आपल्यावतीने सर्वप्रथम रेशन उपलब्ध करुन, त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी त्यांनी आवाजही उठवला होता.
(हेही वाचाः टाळी वाजवायची कुठे जाऊन? जाणून घ्या तृतीयपंथीयांचे दुःख!)
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे तृतीयपंथी समाजाचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे या वंचित समाजासाठी कार्य करणाऱ्या देवामृत फाऊंडेशनने त्यांचे दु:ख जाणून घेत, त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फाऊंडेशनच्या प्रिया जाधव यांनी या लोकांना महिना पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तृतीयपंथीयांनी मांडलेल्या व्यथा आणि आपल्या भावना हिंदुस्थान पोस्टने आता टाळी वाजवायची कुठे, या मथळ्याखाली १५ एप्रिल रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर सर्वच यंत्रणा हलली आणि प्रिया जाधव यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त होऊ लागले.
असे पुढे आले मदतीचे अनेक हात
हिंदुस्थान पोस्टच्या या वृत्ताची दखल नंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी घेतली आणि तृतीयपंथीयांच्या दु:खाची जाणीव सर्व जनतेला झाली. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी याची दखल घेत, भांडुप सोनापूरमधील खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ४० रेशनचे किट उपलब्ध करुन दिले. एस विभागाच्या समाज विकास अधिकारी वेदिका पाटील यांच्या समन्वयाखाली खासगी संस्थांच्या माध्यमातून महापालिका नियोजन विभागाच्या हसनाळे यांनी रेशन किट उपलब्ध करुन दिले आणि त्याचे वाटप बुधवारी ४० तृतीयपंथीयांना करण्यात आले. खासगी संस्थांच्या माध्यमातून प्राप्त झालेले किट सोनापूरमधील तृतीयपंथीयांना पाठवण्यात आले असले, तरी भविष्यामध्ये प्राप्त होणारे रेशन किट अन्य भागातील तृतीयपंथीयांना वितरित केले जातील, असे हसनाळे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय… भाजप नगरसवेकाचा आंदोलनाचा इशारा!)
माणुसकीचे दर्शन
याबाबत देवामृत्त फांऊडेशनच्या प्रिया जाधव यांनी महापालिका नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे यांचे विशेष आभार मानले. त्यांनी अशाप्रकारे तृतीयपंथीयांना रेशन किट खासगी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली आणि त्यातील पहिला हिस्सा हा सोनापूरमधील तृतीयपंथीयांना मिळाला याचा मला आनंद आहे. त्यामुळे या उपेक्षित समाजाची दखल महापालिकेने घेऊन खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हिंदुस्थान पोस्टचे मानले आभार
तृतीयपंथी समाजाच्या व्यथा सरकारच्या कानी पडल्यानंतर, त्यांनीही या समाजालाा १५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचेही जाधव यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे एकप्रकारे या समाजाची दखल महापालिका आणि सरकारने घेऊन आपल्यापरिने मदत करण्याचा प्रयत्न करत खारीचा वाटा उचलत आहेत, हेच माझ्यासाठी खूप आहे. या सामाजाच्या दु:खावर अशाप्रकारे फुंकर मारण्याचा प्रयत्न महापालिका व सरकार करत आहेत आणि हे सर्व ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तामुळे शक्य झाले. यामुळे ‘हिंदुस्थान पोस्ट’चीही मी आभारी आहे.
(हेही वाचाः तृतीयपंथीयांनाही राज्य सरकार देणार 1500 रुपयांचे अनुदान?)
Join Our WhatsApp Community