देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे भाजपला पुन्हा एकदा ताकद
मिळाली आहे. त्यामुळे ३ राज्यांत भाजपाला मिळालेलं यश हे आगामी लोकसभा
निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत
तालीम किंवा लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे.
मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक
झाली तसेच आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने येथील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार
कोण यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Cyclone Michaung: ‘मिचौंग’ने आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी ओलांडली, चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता)
मुख्यमंत्री कोण होणार ?
मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीन
वेळा मुख्यमंत्री आहेत, तर राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांनी २ वेळा मुख्यमंत्रीपद
भूषविले आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांत याच दिग्गजांना संधी मिळणार की भाजपा नवीन
चेहरा शोधाणार याची चर्चा सुरू आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा
निवडणुकीत जी व्यक्ती लोकसभेच्या सर्वच जागा जिंकू शकते, अशाच उमेदवाराला
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता आहे. राजस्थान, छत्तीसगढ
आणि मध्य प्रदेश या ३ राज्यांत ६५ लोकसभा सदस्य असून भाजपाचे लक्ष्य
या जागांवर आहे तसेच या तीन राज्यांतील मुख्यमंत्रीपदासाठीही
भाजपाचे धक्कातंत्र दिसून येईल का, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सरप्राईज
देतील का, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.