मराठी पाट्या(Marathi Sign Board) लावण्यावरून मनसे (MNS) गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. यावरूनच आता ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. मनसेने केलेल्या आंदोलनानंतर ठाणे मनपा (TMC) आयुक्तही चांगलेच कामाला लागले आहेत. ठाणे आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्या नसतील तर शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Marathi Sign Board)
मनसे पदाधिकारी स्वप्नील मेहेंद्रकर यांच्यासह मनसैनिक दुकानात शिरून व्यापाऱ्यांनशी चर्चा करत आहे. तर त्यांनी एका इंग्रजी पाटी असणाऱ्या दुकानाला काळे फासले होते. याच पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील वसंत विहार येथील दुकानांवर इंग्रजी पाट्या असणाऱ्या आस्थापनांना समज दिला आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात इंग्रजी पाट्या मराठी केल्या नाहीत तर पुन्हा एकदा मनसे स्टाईलने त्यांना उत्तर देणार असेही महेंद्रकर यांनी सांगितले आहे. (Marathi Sign Board)
आयुक्तांनीही दुकानदारांना खडसावले
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने 9 प्रभाग समिती मध्ये असणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील दुकाने विविध आस्थापना मराठी पाट्या नसेल तर त्यावरती शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मनसे स्टाईलने खळखट्याक
मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. दुकानाचे नामफलक मराठीत (Marathi Board) झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे.