Maharashtra Assembly winter Session : शरद पवार गटाचे कार्यालय अजित पवार गटाकडे; हिवाळी अधिवेशनात वाद पेटणार

212

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या शरद आणि अजित पवार गटात मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly winter Session) नागपुरात सुरु होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. तत्पूर्वीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

नावाची पाटीही लावली

अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी एका पत्राद्वारे राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशन काळात  (Maharashtra Assembly winter Session) विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आपल्या गटाला देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, अध्यक्षांनी ही मागणी मान्य करत हे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या कार्यालयावर अजित पवार गटाचे नेते तथा मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे. यामुळे या गटाचा शरद पवार गटाशी मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा Maharashtra Assembly winter Session : विरोधकांचा मनसुबा सत्ताधारी उधळणार; काय असणार सरकारचा ‘प्लॅन’?)

शत्रूत्व टोकाला पोहचणार 

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शरद आणि अजित पवार अशी 2 शकले पडली आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्हावरही दावा ठोकला. सध्या या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. त्यात हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहेत. त्यातच आता विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला दिल्यामुळे दोन्ही गटांतील राजकीय शत्रूत्व आणखी टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.