भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक योद्ध्यांनी आणि नेत्यांनी आपले योगदान दिले आहे. मात्र अनेकांबद्दल आजही जनतेला पुरेशी माहिती मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका क्रांतिकारकाबद्दल सांगणार आहोत. बाघा जतीन (Bagha Jatin) एक महान क्रांतिकारक होते. त्यांचे पूर्ण नाव जतींद्रनाथ मुखर्जी. ७ डिसेंबर १८७१ मध्ये त्यांचा जन्म नंदा जिल्ह्याच्या कुष्ठिया येथील कायाग्राम या गावात झाला. आता हा जिल्हा बांगलादेशमध्ये येतो.
जतींद्रनाथ मुखर्जी हे केवळ पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची आई शरतशशी मुखर्जी या अतिशय प्रतिभावान कवयित्री होत्या. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे ते स्वामी विवेकानंदांच्या भेटीला जाऊ लागले. स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक विचारांचा आणि स्वतंत्र भारताच्या दृष्टीकोनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. मानवतेच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे, असा त्यांचा विश्वास होता.
वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक पास केले आणि स्टेनोग्राफी शिकून आपल्या कलकत्ता विद्यापीठात प्रवेश घेतला. असं म्हटलं जातं की ते २७ वर्षांचे होते तेव्हा ते एकदा जंगलातून जात असताना अचानक त्यांच्यासमोर वाघ आला. मात्र त्यांनी वाघाला मारुन टाकले. या घटनेनंतर लोक जतींद्रनाथ यांना ‘बाघा जतीन’ (Bagha Jatin) म्हणू लागले.
(हेही वाचा-Navi Mumbai Police : ‘त्या’ ८ मुलांचे अपहरण झाले नाही ;तर रागाच्या भरात घर सोडून गेली)
वंग-भंग विरोधातील आंदोलनाच्या वेळी त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला. १९१० रोजी हावडा षडयंत्र प्रकरणात त्यांना अटक झाली आणि जेलची वारी करावी लागली. त्यानंतर ते युगांतर पार्टीत कार्य करु लागले. क्रांतीकारकांना आपल्या चळवळीसाठी निधी उभारायचा होता. त्या काळी दरोडा टाकून निधी उभारला जायचा. दुलरिया नावाच्या ठिकाणी एका भीषण दरोड्यादरम्यान क्रांतिकारक अमृत सरकार हे त्यांच्याच पक्षाच्या सहकाऱ्याच्या गोळीने जखमी झाले. पैसे घेऊन पळून जायचे की त्याच्या मित्राचा जीव वाचवायचा, ही गंभीर समस्या निर्माण झाली होती. अमृत सरकार यांनी जतींद्र नाथ यांना पैसे घेऊन पळून जाण्यास सांगितले.
जतींद्रनाथ यासाठी तयार नव्हते तेव्हा अमृत सरकार यांनी आदेश दिला – ‘माझे डोके कापून घेऊन जा जेणेकरून इंग्रजांना ओळखता येणार नाही.’ या दरोड्यांपैकी ‘गार्डन रीच’ दरोडा हा अतिशय गाजला होता. या दरोड्यामागील प्रमुख प्रेरणा जतींद्रनाथ मुखर्जी यांची होती.
महायुद्ध सुरू झाले होते. त्या काळात राडा कंपनी कलकत्त्यात बंदुका आणि काडतुसांचा व्यापार करत असे. या कंपनीचे एक वाहन रस्त्यावरून बेपत्ता झाले होते ज्यात क्रांतिकारकांकडून ५२ माऊजर पिस्तूल आणि ५० हजार गोळ्या क्रांतिकारकांच्या हाती सापडत्या. ‘बलिया घाट’ आणि ‘गार्डन रीच’च्या दरोड्यांमध्ये जतींद्र नाथ यांचा हात असल्याचे ब्रिटिश सरकारला माहीत होते. पोलिसांना जतींद्र नाथ यांचा ठावठिकाणा कळला होता. ९ सप्टेंबर १९१५ रोजी ती दुर्दैवी घटना घडली. गावकर्यांनी जतींद्रनाथ यांना पकडून देण्यासाठी पोलीसांना मदत केली. तेव्हा झालेल्या गोळीबारात जतींद्रनाथ जखमी झाले आणि दुसर्याच दिवशी इस्पितळात त्यांनी प्राण त्यागले. एका महान क्रांतिकारकाचा अंत झाला. मात्र त्यांच्या प्रेरणेतून स्वातंत्र्य लढा सुरुच राहिला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community