सुखलाल सांघवी (Sukhlal Sanghvi) यांचा जन्म ८ डिसेंबर १८८० रोजी गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील लिमली गावात झाला. ते चार वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. त्यांचे संगोपन त्यांचे दूरचे नातेवाईक मुलजीभाई यांनी केले. ते सोळा वर्षांचे असताना स्मॉल पॉक्समुळे त्यांची दृष्टी गेली. मात्र दृष्टी गेल्यामुळे ते अंतर्मनाशी एकरुप झाले.
ते जैन भिक्षूंच्या प्रवचनांना उपस्थित राहू लागले आणि इतर लोक त्यांना धर्मग्रंथ वाचून देत, अशाप्रकारे त्यांनी ग्रंथांचा अभ्यास केला. १९०४ मध्ये ते बनारस येथील श्री यशोविजय जैन संस्कृत पाठशाळेत सामील झाले. तिथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि भाषाशास्त्राचा अभ्यास केला. पुढील अभ्यासासाठी ते १९११ मध्ये मिथिला येथे गेले. तेथे त्यांनी विद्वान बालकृष्ण मिश्रा यांच्याकडे अभ्यास केला आणि नंतर वाराणसी येथे त्यांनी जैन साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे भाषांतर आणि भाष्य करण्यास सुरुवात केली. न्यायचार्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ते जैन पाठशाळांमध्ये शिकवू लागले.
(हेही वाचा Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरात पुन्हा अपहार; 16 सदस्यीय समितीच्या अहवालात झाले पाप उघड)
१९२२ मध्ये ते गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्त्व मंदिरात भारतीय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९३४ ते १९४४ पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठात जैन तत्त्वज्ञानाचे अध्यक्ष होते. त्यांना पंडित सुखलालजी म्हणूनही ओळखले जाते. ते जैन विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. ते जैन धर्मातील स्थानकवासी पंथाचे होते. विद्वान आणि संस्कृत भाषेचे लेक्चरर पॉल डुंडस त्यांना जैन तत्त्वज्ञानाचे सर्वात भेदक आधुनिक व्याख्याकार म्हणतात. ते प्रसिद्ध जैन विद्वान पद्मनाभ जैनी यांचे गुरू होते.
सुखलालजी (Sukhlal Sanghvi)हे लेखक होते. त्यांनी संस्कृतमधून गुजराती आणि हिंदीमध्ये अनेक ग्रंथांचे संपादन आणि भाषांतर केले आहे. त्यांच्या लेखन कार्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. ते दृष्टिहीन असूनही खूप शिकलेले होते.
Join Our WhatsApp Community