BMC Market licence Holder : मंडईतील गाळा, जागा आणि दुकानही होणार विवाहित मुलींच्या नावे

विशेष म्हणजे या निर्णयाचा सर्वाधिक लाभ हा कोळी भगिनींना होणार असून अनेक कोळी महिलांना आता आपल्या विवाहित मुलींच्या नावे परवाना हस्तांतरीत करता येणार आहे.

1416
BMC Market licence Holder : मंडईतील गाळा, जागा आणि दुकानही होणार विवाहित मुलींच्या नावे
BMC Market licence Holder : मंडईतील गाळा, जागा आणि दुकानही होणार विवाहित मुलींच्या नावे
  • सचिन धानजी,मुंबई

महापालिकेच्या मंड्यांमधील परवानाधारक गाळेधारकांना त्यांचा परवाना हा आपल्या वारसांच्या नावावर करून त्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात येते. परंतु विवाहित मुलगी ही कायदेशीर वारसदार नसल्याने आजवर मुलीच्या नावावर परवाना हस्तांतरीत होत नाही. परंतु आता महापालिकेच्या बाजार विभागाच्यावतीने परवानाधारक गाळेधारकांना त्यांच्या विवाहित मुलीच्या नावावर परवाना हस्तांतरीत करता येईल अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडईतील जागा, दुकान आणि गाळा हा विवाहित मुलींच्या नावे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वडिलांच्या नावे असलेला परवानाच आता मुलीच्या नावे हस्तांतरीत होऊन गाळा, दुकान आणि जागेचा ताबा होणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा सर्वाधिक लाभ हा कोळी भगिनींना होणार असून अनेक कोळी महिलांना आता आपल्या विवाहित मुलींच्या नावे परवाना हस्तांतरीत करता येणार आहे. (BMC Market licence Holder)

बाजार खात्याचे एकूण १७.५६० परवानाधारक

मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारित ९२ विद्यमान मंड्या असुन १०३ मंडया या समायोजन आरक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व मंड्यांमध्ये बाजार खात्याचे एकूण १७.५६० परवानाधारक आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४०१ व ४७९ अन्वये मार्केटेबल व नॉन मार्केटेबल या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी बाजार खात्याकडून परवाना देण्यात येतो. (BMC Market licence Holder)

(हेही वाचा – Online Game 52 Arrested : ऑनलाईन गेममधून युवकांची फसवणूक, ३ वर्षात ३६ गुन्हे दाखल, ५२ अटकेत)

विवाहित मुलींचा समावेश नाही

महानगरपालिका मंड्यांमधील परवानाधारकांना त्यांच्या गाळा, जागा तथा दुकाने इत्यादीच्या परवान्याचे हस्तांतरण हे कायदेशीर वारसाच्या नावे अथवा दूरच्या नातेवाईकांच्या नावे अथवा भागीदारी संपुष्टात आल्या कारणाने अथवा पोटभाडेकरू तत्वावर हस्तांतरण करण्यास स्थायी समितीने यापूर्वीच प्रशासकीय आकार तथा अधिमूल्य आकारुन मंजुरी दिली होती. या परवाना पत्राचे कायदेशीर वारसतत्वावर हस्तांतरण करण्याकरिता हिंदू कायदयानुसार कायदेशीर वारस ज्या नात्यांचा उल्लेख केला आहे, त्यात विवाहित मुलींचा समावेश नाही. (BMC Market licence Holder)

विवाहित मुलगी ही दूरचे नातेवाईक

परवानाधारकाची विवाहित मुलगी अंतर्भूत नसल्यामुळे विवाहित मुलगी ही दूरचे नातेवाईक म्हणून ग्राह्य धरण्यात येत होती. बाजार विभागाकडे परवानाधारकाच्या निधनानंतर विवाहित मुलीच्या नावे परवाना पत्राचे हस्तांतरण करण्याकरिता अर्ज होत असतात. परंतु विवाहित मुलगी ही कायदेशीर वारसांच्या सूचीमध्ये नसल्यामुळे या प्रकरणांमध्ये बाजार विभागाला निर्णय घेता येत नव्हता. (BMC Market licence Holder)

(हेही वाचा – Aaditya L 1: आदित्य १ बाबत मोठी अपडेट ,पहिल्यांदाच समोर आली सूर्याची छायाचित्र)

लाभ विवाहित मुलींनाही मिळणार

परंतु, विवाहित मुलीच्या नावे कायदेशीर वारसातत्वावर परवाना पत्राचे हस्तांतरण करण्याबाबत केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय यांनी हिंदू उत्तराधिकारी अधिनियमामध्ये सन २००५ मध्ये सुधारणा करुन ज्या प्रमाणे मुलीला देखील मुलाप्रमाणे पालकांच्या संपत्तीत समान हक्क दिला आहे, त्याचप्रमाणे बाजार विभागाच्या अखत्यारितील गाळे, जागा तथा दुकाने इत्यादींच्या परवाना पत्राचे हस्तांतरण प्रकरणी अविवाहित अथवा विवाहित मुलीला कायदेशीर वारस म्हणून गाह्य धरल्यास मुलीच्या नावे परवाना पत्र कायदेशीर वारसतत्वावर हस्तांतरण करता येईल, असे बाजार विभागाने नमुद केले असून याबाबतचा मसुदा तयार करून प्रशासकांची मंजुरीला पाठवला जाणार आहे. त्यानंतर याचा लाभ विवाहित मुलींनाही मिळणार असून बाजार विभागाच्यावतीने अशाप्रकारचे अर्ज निकालात काढले जातील असे बाजार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC Market licence Holder)

कोळी समाजातील महिलांना सर्वाधिक लाभ

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मासे विक्रीच्या व्यवसायामध्ये मोठ्याप्रमाणात कोळी भगिनी असून विशेषत: महिलाच या मासे विक्रीचा व्यवसाय करत असल्याने कोळी महिलेचा वारस जर हा व्यवसाय करत नसल्यास ते परवान्याचे नुतनीकरणही करत नाहीत. त्यामुळे जर त्यांच्या मुलींच्या नावे हा परवाना हस्तांतरीत झाल्यास त्या या व्यावसाय करु शकतील आणि त्यांच्या परवान्याचे नुतनीकरणही वेळीच होईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयामुळे महिला वर्गाला याचा फायदाच होणार असून विशेषत: कोळी समाजातील महिलांना सर्वाधिक लाभ होणार असल्याचेही बोलले जात आहे. (BMC Market licence Holder)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.