- संतोष वाघ
राष्ट्रीय तपास यंत्रनेने (एनआयए) (NIA) पडघा येथून नुकतीच अटक करण्यात आलेल्या १५ संशयित दहशतवाद्यांपैकी त्यांचा म्होरक्या आणि इसिस या दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्र प्रमुख ६३ वर्षांचा साकीब नाचनचे संबंध खलिस्तानी दहशतवादी तसेच पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी होते, असे समोर येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एनआयएने शनिवारी पहाटे पडघा-बोरिवली येथे केलेल्या छापेमारीदरम्यान मोहम्मद साकीब अब्दुल हमीद नाचन उर्फ रविश उर्फ साकीब उर्फ खालिद याच्यासह १५ जणांना अटक करण्यात आली. साकीब नाचन हा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'(इसिस) या दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्र प्रमुख आहे तसेच त्याचे थेट संबंध खलिस्तानी दहशतवादी तसेच ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी होते असे समोर आले आहे. साकीब हा बीकॉम ग्रॅज्युएट आहे. साकीब नाचन हा १९९१ पासून दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे सांगितले जाते. बाबरी मशीद पडल्यानंतर साकीब नाचन चे दहशतवादी कृत्ये अधिक वाढली होती.
साकीब नाचनचा इतिहास…
१९९८ साली बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी साकीबवर गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याला टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. टाडातून बाहेर आल्यानंतर त्याने ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या बंदी घालण्यात आलेला संघटनेचा सेक्रेटरी म्हणून काम करू लागला. त्याने सिमी या संघटनेत मुस्लिम तरुणांना भरती करून पडघ्यातील डोंगराळ भागात प्रशिक्षण कॅम्प उभे केले होते. त्या ठिकाणी सिमी या संघटनेत भरती करण्यात आलेल्या तरुणांना शस्त्रे चालवणे, स्फोटके बनविणे यासारखे प्रशिक्षण देवून एक स्लीपर सेल तयार केले होते. सिमी या संघटनेवर बंदी घालण्यापूर्वी पडघ्यात साकीबने सिमीचे कार्यालय उघडले होते.
साकीबला अटक आणि १० वर्षे तुरुंगवास…
मुंबईत २००२ -०३ साली विलेपार्ले, मुंबई सेंटर, घाटकोपर आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी साकीब नाचनला अटक करण्यात आल्यानंतर पडघा गाव चर्चेत आले होते. साकीब अटकेनंतर पोलिसांकडून पडघ्यातील सिमीचे कार्यालय,प्रशिक्षण सेंटर उध्वस्त करण्यात आले होते. साकीब नाचन हा अटकेपूर्वी इंजिनिअर मुझम्मील अन्सारी आणि एका आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारा एमबीए असलेला आतिफ मुल्ला यांच्या संपर्कात होता. त्यांनी डॉक्टर वाहिद अन्सारी या युनानी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये बॉम्ब तयार केले होते असा आरोप त्यांच्यावर होता. साकीब नाचन आणि इतरांना अटक केल्यानंतर साकीब नाचनला १०वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. साकीब याने तुरुंगात राहून कायद्याचा अभ्यास करून स्वतःच खटला न्यायालयात त्याने स्वतःच लढवला होता. २०१७ मध्ये शिक्षा पूर्ण करून साकीब नाचन हा तुरुंगातून बाहेर पडला, आणि पुन्हा पडघा-बोरिवली येथे कुटुंबात राहू लागला होता.
शिक्षा भोगून आल्यानंतर साकीब पुन्हा ….
सिमीच्या बंदी नंतर त्याने ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'(इसिस)या संघटनेत प्रवेश केला आणि तो इसिस चा महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख नेता बनला होता. पडघ्यात त्याने पुन्हा देशविरोधी कारवायाना सुरुवात केली. राज्य एटीएस आणि एनआयए या तपास यंत्रणांनी जुलै २०२३ मध्ये इसिसचे पुणे मॉड्युल उध्वस्त करून देशात मोठा घातपाता
चा कट हाणून पाडत पुणे, मुंबई, आणि पडघ्यातून सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यात पडघा येथून साकीब नाचनचा मुलगा शमील नाचन, नातेवाईल अकिब नाचन,जुल्फिकार अली बडोदावाला यांचा समावेश होता. या दहशतवाद्याना अटक केल्यानंतर साकीब नाचन देखील एनआयए च्या रडारवर आला होता,परंतु त्याच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम एनआयए आणि एटीएस या तपास यंत्रणेकडून सुरू होते.
पुरावे मिळताच साकीबला अटक …
साकीब नाचन आणि इतरां विरोधात भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागताच शनिवारी पहाटे (९ डिसेंबर २०२३) एनआयए आणि एटीएसने पडघा- बोरिवली सह कर्नाटक ,पुणे,ठाणे आणि मीरारोड येथील ४४ ठिकाणावर एकाच वेळी छापेमारी करून साकीब नाचनसह १५जणांना अटक करण्यात आली.