सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि ऑक्सिजन तुटवड्याने मृत्यू दर वाढलेला असताना शिर्डी साईबाबा संस्थानाने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संस्थानाला कोणताही उपक्रम सुरु करायचा असेल खर्चासाठी उच्च न्यायालयाकडून मंजुरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार संस्थानने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली असता न्यायालयाने संस्थानाला परवानगी दिल्याने संस्थांना १.०५ कोटी खर्च करून ऑक्सिजन प्लांट आणि आरटीपीसीआर कोरोना चाचणी लॅब उभारणार आहे.
ऑक्सिजनचा प्लांट युद्धपातळीवर उभारण्याचा आदेश!
नाशिक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा युद्धपातळीवर करावा, नवीन आरटी-पीसीआर प्रयोगशाळा तसेच ऑक्सिजन प्रकल्प तयार करण्याचे शिर्डी साईबाबा संस्थानला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. ही प्रयोगशाळा कोविड चाचण्यांसह इतर पॅथॉलॉजिकल चाचण्यांसाठी देखील बनविली जाईल. संस्थान प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यासह सर्व कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी ५२० खाटा उपलब्ध!
कोरोनाबाधित रुग्णांसाठी संस्थानने यापूर्वी इमारती राखून ठेवल्या आहेत. तिथे रुग्णांची देखभाल केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला दिली. संस्थानमध्ये कोविड रुग्णांसाठी जवळजवळ 520 खाटा उपलब्ध केल्या आहेत. संस्थानकडे आवश्यक परिचारिका व मदतनीस आहेत. सध्या डॉक्टरही उपलब्ध आहेत. आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यासंदर्भात संस्थेच्या काही कर्मचार्यांना यापूर्वीच नेमण्यात आले. कोविडसाठी 1.05 कोटी रुपयांची प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे, असे सरकारने न्यायालयाला सांगितले.
Join Our WhatsApp Community