Sewage Treatment : शौचालयांच्या टाकीतील मलावर प्रक्रिया करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरात दोन अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र

591
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईमध्ये मलनि:सारण वाहिनीचे जाळे परवण्याचे काम सध्या सुरु असले तरी ज्या भागांमध्ये मलवाहिनीची सेवा नाही त्या भागांमध्ये मलकुंडासह शौचालयांची उभारणी केली जाते. त्या मलकुंडात साचला जाणारा मल हा मनुष्यबळ वापरुन  उपसा केला जातो. या मलकुंडातील मलावर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करण्यासाठी दोन अत्याधुनिक पध्दतीचे मल प्रक्रिया (Sewage Treatment) केंद्र उभारली जाणार आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र मल प्रक्रिया केंद्र उभारली जाणार असून यासाठी तब्बल ४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

सातही मल जल प्रक्रिया केंद्रांसाठी २६ हजार कोटी रुपये खर्च होणार

मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप, वर्सोवा, वांद्रे, मालाड, वरळी, धारावी आणि घाटकोपर या सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या सातही मल जल प्रक्रिया केंद्रावर प्राथमिक, दुय्यम आणि तृत्तीय स्तरीय प्रक्रिया केली जातात. या सर्व सातही मल जल प्रक्रिया (Sewage Treatment) केंद्रांसाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. याला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर या सर्व प्रकल्प कामांना सुरुवात केली जात आहे.

(हेही वाचा Uday Samant : भिवंडी महापालिकेतील अधिकाऱ्याच्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार; उदय सामंत यांचे आश्वासन)

अनेक शौचालये मलनि:सारण वाहिन्यांना जोडलेल्या नाहीत

मलवाहिनीतून वाहून येणाऱ्या मल जलावर प्रक्रिया या सर्व केंद्रावर केली जात असली तरी अनेक शौचालये ही मलनि:सारण वाहिन्यांना जोडलेल्या नाही. त्या शौचालयातील मल हा त्याठिकाणी असलेल्या मलकुंडात साचला जातो. त्यामुळे अशाप्रकारे साचला जाणारा मल हा कुंडातून बाहेर उपसा करून त्यांची विल्हेवाट लावला जात असला तरी त्याची प्रक्रिया शास्त्रोक्तपणे केली जात नाही. त्यामुळे प्रत्यक्षात मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होण्यासाठी काही वर्षे लागणार आहे. त्यामुळे लाईम स्टॅबीलायझेन पध्दतीने स्लज प्रक्रिया केंद्राची उभारणी दोन ठिकाणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

मलजल प्रक्रिया केंद्रासाठी सुमारे सहा वर्षांचा कालावधी लागणार

महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय शहरी स्वच्छता धोरण तसेच महाराष्ट्र राज्य स्वच्छता मिशन अन्वये मलकुंडात जमा होणा-या मलाची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट तथा  प्रक्रिया करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. परंतु मुंबईतील महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या आणि जेथे मलनिःसारण वाहिनी उपलब्ध नाही, तेथे मल कुंडाची व्यवस्था केली आहे. मलकुंडात जमा होणारा मलाचा ठराविक कालावधीनंतर उपसा करण्याची आवश्यकता असते. पण शौचालयाच्या मलकुंडात साचलेल्या मलाचा उपसा मनुष्यबळ वापरून करण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. त्यामुळे शौचालयाच्या मलकुंडातील साचलेला मल उपसा करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागात विशिष्ट पध्दतीच्या स्लज डिवॉटरींग वाहने उपलब्ध आहेत. त्या वाहनांद्वारे मल कुंडातील मल उपसा करून  सिल्ट ड्राईंग प्लांटमध्ये प्रक्रिया केली जाते. परंतु मलकुंडात निर्माण होणा-या मैलाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने सध्याचे सिल्ट ट्रीटमेंट प्लांटची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे मलकुंडातील मलावर प्रक्रिया करण्यासाठी कुठलीही अतिरिक्त सुविधा उपलब्ध नसल्याने येणा-या काळात शौचालयाच्या मलकुंडाच्या सफाईतून निर्माण होणा-या मलाची शास्त्रोक्त प्रक्रिया व विल्हेवाट करण्यासाठी पूर्व व पश्चिम उपनगरामध्ये दोन प्रक्रिया केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे.  मुंबई मल जल विल्हेवाट प्रकल्प (MSDP) खात्यामार्फत नव्याने तयार होणा-या मलजल प्रक्रिया केंद्रासाठी सुमारे सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हे दोन मल जल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून या दोन्ही प्रकल्पांच्या उभारणीसह पुढील आठ वर्षांच्या देखभालीसाठी सुमारे ४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या मज जल प्रक्रिया केंद्रासाठी एचईसी एन्व्हायरो इंडिया लिमिटेड यां कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दोन प्रक्रिया केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे ९ कोटी रुपये आणि आठ वर्षांच्या देखभालीवर सुमारे ३२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.