Ind vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघाची मालिकेत १-१ ने बरोबरी 

सुर्यकुमार यादवचं विक्रमी शतक आणि कुलदीप यादवने घेतलेले ५ बळी यामुळे भारताचा मोठा विजय साकार झाला 

208
Ind vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघाची मालिकेत १-१ ने बरोबरी 
Ind vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघाची मालिकेत १-१ ने बरोबरी 

ऋजुता लुकतुके

आघाडीच्या ३ फलंदाजांचा अपवाद सोडला तर या सामन्यात भारताच्या ६ फलंदाजांची धावसंख्या एकेरी होती. दोघांनी तर भोपळाही फोडला नाही. पण, तरीही निर्धारित २० षटकं पूर्ण झाली तेव्हा भारतीय संघाच्या (Ind vs SA 3rd T20) धावफलकावर ७ बाद २०१ अशा धावा होत्या. कारण, सलामीवीर यशस्वी जयवालच्या ४१ चेंडूत ६० धावा. आणि कर्णधार सुर्यकुमार यादवच्या ५६ चेंडूंत १०० धावा. यापैकी सुर्यकुमार तर मैदानावरचं वादळ होतं. वादळापेक्षा जास्त वेगाने त्याचे चेंडू हवेत घोंघावत होते.

त्याने ८ षटकार आणि ७ चौकार ठोकले. आणि यातला प्रत्येक षटकार हवेत वाऱ्याशी स्पर्धा करत होता. टी-२० क्रिकेटमध्ये सुर्यकुमार सध्या अव्वल का आहे हे जोहानसबर्गमध्ये त्याने दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाकडे सुर्याला कसं थोपवायचं याचं उत्तर नव्हतं. नाही म्हणायला केशव महाराज आणि तबरेझ शाम्सी यांची फिरकी प्रभावी ठरली. महाराजने तर ६.५ च्या गतीने धावा दिल्या.

विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर २०२ धावांचं आव्हान आलं. मागच्या सामन्यात भारतीय गोलंदाजी (Ind vs SA 3rd T20) दुबळी ठरली होती. खास करून अर्शदीप आणि मुकेश यांना चांगलाच मार बसला होता. उलट दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हेनरिक्स, ब्रिट्झ आणि मार्करम फॉर्मात होते. पण, यावेळी महम्मद सिराजने सुरुवातीच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. आणि २ षटकांत फक्त ४ धावा दिल्या. मुकेश कुमारने ब्रिट्झ आणि अर्शदीपने क्लासेनला झटपट बाद केलं. तर सलामीवीर हेनरिक्स धावचीत झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे पहिले तीन गडी ४२ धावांतच बाद झाले होते.

पण, यावेळी आफ्रिकेची मधली फळीही कमाल दाखवू शकली नाही. खरंतर कुलदीप आणि जाडेजाच्या फिरकीसमोर ती कमी पडली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीत जमच बसला नाही. आणि त्यांचा अख्खा संघ १४ व्या षटकांतच ९५ धावांमध्ये गुंडाळला गेला.

ही किमया केली ती रवी जाडेजा आणि लेगस्पिनर कुलदीप यादवने. जाडेजाने मार्करमला बाद केल्यानंतर कुलदीपने तळाचे फलंदाज अगदी लिलया जाळ्यात ओढले. त्याच्या गोलंदाजीचं पृथ:करण होतं २.५ षटकं, १७ धावा आणि ५ बळी. टी-२० क्रिकेटमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आणि ती ही वाढदिवसाच्या दिवशी केलेली.

भारतीय संघाने या मालिकेत चांगलं पुनरागमन केलं. सलग दोन सामन्यांत अप्रतिम फलंदाजी करणारा सुर्यकुमार सामनावीराबरोबरच मालिकावीरही ठरला. आता १७ तारखेपासून दोन्ही संघा दरम्यान एकदिवसीय मालिका सुरू होईल. भारताच्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व के एल राहुल करणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.