उबाठा सेनेचा धारावी मधील मोर्चा म्हणजे धारावीच्या पुनर्विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. शिवसेना भवनाच्या पुनर्विकासाच्या वेळेस २००९ मध्ये पाडण्यात आलेल्या ८ इमारतींमधील १०८ मराठी कुटुंबांना अद्यापही घर मिळाले नाही. तसेच दादर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ५ हजार मराठी कुटुंब अजूनही हक्काच्या घरासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठीही मोर्चा माजी मुख्यमंत्र्यांनी काढायला हवा, असाही सल्ला खासदार शेवाळे यांनी दिला. (Dharavi Redevelopment MP Shewale)
धारावीचा पुनर्विकास अदानी समुहाच्या माध्यमातून केला जात असल्याने याला विरोध करण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह इतर सर्व पक्षांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा समाचार खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना घेतला. शेवाळे म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्पाची दुसरी निविदाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात ठरविण्यात आलेल्या अटी आणि शर्ती नुसार काढण्यात आलेली आहे. मात्र, आता या पुनर्विकास प्रकल्पाबाबत शंका उपलब्ध करून त्याला विरोध करणे, हे दुर्दैवी आहे. (Dharavi Redevelopment MP Shewale)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे हा मोर्चा म्हणजे काही विकासकांची सुपारी घेऊन काढलेला मोर्चा आहे. टिडिआर चा मुद्दा हा तांत्रिक असून आधीच्या अटी आणि शर्ती नुसारच आहे,असे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे धारावीतील जनतेसाठी मोर्चा काढणाऱ्या उबाठा सेनेने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळ आणि इतर अनेक प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या मराठी लोकांसाठी का मोर्चा काढला नाही? असा सवालही खासदार शेवाळे यांनी केला. (Dharavi Redevelopment MP Shewale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community