भारतीय तत्वज्ञानात गुरुला फार महत्व आहे. गुरुला ईश्वरापेक्षाही अधिक महत्व दिले आहे, कारण गुरूच ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरूंचा शोध हा वास्तविक स्वतःचा शोध असतो. आनंद मॅथ्यू यांनी गुरूंचा शोध घेताना सनातन धर्माचे (Sanatan Dharm) अनुभवसिद्ध तत्वज्ञान सोप्या भाषेत युवकांना विशद करून सांगितले आहे, असे सांगून राज्यपाल रमेश बैस यांनी ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ या पुस्तकाचे लेखक आनंद मॅथ्यू यांचे अभिनंदन केले.
अमेरिकन सिनेमॅटोग्राफर व सनातन धर्माचे (Sanatan Dharm) अभ्यासक आनंद मॅथ्यू यांनी लिहिलेल्या ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, १६ डिसेंबर रोजी राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल जी डी बक्षी, निवृत्त कर्नल अशोक किणी, पुस्तकाचे लेखक आनंद मॅथ्यू, अध्यात्मिक गुरु मोहनजी, विश्व संवाद केंद्राचे मुख्य संवाद अधिकारी निशिथ भांडारकर व निमंत्रित उपस्थित होते.
आज विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक ज्ञान – विज्ञान शिकवले जाते. मुलांचा बुद्ध्यांक वाढत आहे. परंतु जीवन जगण्याची कला त्यांना शिकवली जात नाही. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक वैयक्तिक, सामाजिक तसेच राष्ट्र स्तरावर अशांत व बेचैन आहे. मात्र सनातन धर्माच्या (Sanatan Dharm) माध्यमातून वैयक्तिक, सामाजिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते, असे राज्यपालांनी सांगितले.
(हेही वाचा Parliament Attack : संसदेतील घुसखोरी शहरी नक्षलवाद्यांचा कट?)
युद्ध क्षेत्रात असताना अध्यात्माकडे वळालो – निवृत्त मेजर जनरल जी डी बक्षी
भारतीय सेना दलात ४१ वर्षे कार्यरत असताना १९७१चे युद्ध, कारगिलचे युद्ध त्याचबरोबर काश्मिरातील चकमकींमध्ये सहभागी होतो. त्यावेळी माझ्या आजूबाजूला जवानांचा मृत्यू होताना मी पाहिले, अनेकांना मारताना मी पाणी पाजले. हे सगळे पाहिल्यावर आपोआप माझ्या जीवनात अध्यात्म आले. पाश्चिमात्य ज्ञान हे केवळ थेअरीवरच आधारित आहे, पण भारतीय तत्वज्ञान हे अनुभव, अनुभूतीवर आधारित आहे, आनंद मॅथ्यूज यांनी लिहिलेले पुस्तक असेच अनुभव, अनुभूतींवर आधारित आहे, असे निवृत्त मेजर जनरल जी डी बक्षी म्हणाले.
गुरुकृपेशिवाय मोक्ष शक्य नाही – निवृत्त कर्नल अशोक किणी
जेव्हा कारगिलचे युद्ध होते, तेव्हा आपल्याकडे वीरगती मिळालेल्या जवानांचे शव त्यांच्या त्यांच्या कुटुंबांकडे पाठवण्याची जबाबदारी होती. ही जबाबदारी सांभाळतानाच मी अंतर्मुख झालो आणि अध्यात्माच्या दिशेने माझा प्रवास सुरु झाला. जीवनात गुरुकृपेशिवाय मोक्ष शक्य नाही, पण त्यासाठी आपल्याला भाव हवा. जेव्हा आनंद मॅथ्यू माझ्याकडे आला होता तेव्हा त्याच्यात भरपूर नकारात्मकता होती, त्याच्या लहानपणी बरीच संकटे आली, पण जेव्हा त्याला मी दिशा दिली आणि त्यानेही तितक्याच तळमळीने प्रयत्न केले, त्यामुळेच आज त्याच्यातील आत्मा जागृत झाला आहे, असे निवृत्त कर्नल अशोक किणी म्हणाले.
सनातन धर्म जीवनात आनंदी कसे राहायचे शिकवतो – आनंद मॅथ्यू
लहानपणी माझे आयुष्य खूप आव्हाने आणि संकटांनी भरलेले होते. नंतर मी सिनेमॅटोग्राफर म्हणून जगभर भ्रमंती सुरु केली, जेव्हा भारतात मी आलो तेव्हा मला अध्यात्म समजले. जीवनाचा उद्देश समजला. विशेष म्हणजे भारतातील तरुण मात्र यापासून दूर असल्याचे मला आढळून आले. सनातन धर्म जीवनात आनंदी कसे राहायचे शिकवत असतो. स्वतःचा शोध घेत असताना मला गुरु अशोक किणी भेटले, त्यांनी मला दिशा दिली. हे पुस्तक फक्त माझा अध्यात्माचा मार्ग सांगत नाही, तर प्रत्येकाचा अध्यात्मातील प्रवास मांडत आहे, असे ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ या पुस्तकाचे लेखक आनंद मॅथ्यू म्हणाले.
Join Our WhatsApp Community