माहेरी राहणारी २४ वर्षीय विवाहिता मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी मुंबईत आली असता पतीच्या सांगण्यावरून पतीच्या दोन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घाटकोपर पूर्व येथे शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी पतीसह तीन जणांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा (Crime) दाखल करून पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
पीडित विवाहितेचे माहेर सांगली जिल्ह्यात असून चार वर्षांपूर्वी तिचा विवाह घाटकोपर पूर्व येथे राहणाऱ्या तरुणासोबत झाला होता. पीडितेला एक मुलगी असून मुलगी ६ महिन्यांची असताना पीडिता ही माहेरी गेली होती. त्यानंतर तिचा पती तिला घेण्यासाठी आलाच नसल्यामुळे पीडिता मुलीसह माहेरीच थांबली होती.
गेल्या आठवड्यात पीडिता मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी मुंबईत आली होती. ती घाटकोपर येथे दिराच्या घरी गेली असता तिचा पती तिला भेटला व लवकरच घर भाड्याने घेऊन पत्नी आणि मुलीला मुंबईत घेऊन येऊ असे बोलून तो पत्नीला घेऊन एका निर्जन ठिकाणी आला, त्या ठिकाणी पतीचा एक मित्र अगोदरच येऊन थांबलेला होता. पतीने पीडितेला मित्राची ओळख करून दिली व तो आपल्याला घर भाड्याने घेण्यासाठी पाच हजार रुपयांची मदत करणार आहे असे सांगून पत्नीला बळजबरीने त्याचासोबत शरीर सबंध ठेवण्यास लावले व त्यानंतर या गोष्टीची कुठेही वाच्यात करून नकोस नाहीतर समाजात तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली.
त्याच दिवशी रात्री त्याने पत्नीला आणखी एका अर्धवट बांधकाम साईटवर आणून दुसऱ्या मित्रा सोबत पत्नीला बळजबरीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले व तिला मारहाण देखील केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने पतीविरुद्ध पंतनगर पोलिस ठाण्यात मारहानीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती विरुद्ध अदखलपात्र गुन्हा (Crime) दाखल केला होता. त्यानंतर पीडितेने गावी सांगली येथे जावून तिच्या सोबत घडलेल्या प्रसंगाबाबत तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांगली पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पुढील तापसासाठी गुन्हा पंतनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. शुक्रवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडितेच्या पतीसह तिघांना अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community