अखेर केंद्र आले धावून! रेमडेसिवीरचा राज्याला जादा पुरवठा! 

गेले महिनाभर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये रेमडेसिवीर मिळण्यावरून तीव्र असंतोष निर्माण झाला होता. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिवीरसाठी रांगा लागल्या.

144

राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते, तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. शनिवारी, २४ एप्रिल रोजी केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीरच्या व्हायल्सचा पुरवठा करण्याचा आदेश काढला आहे. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

सात परवानाधारक उत्पादक कंपन्या करणार पुरवठा! 

देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि रेमडेसिवीर मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेतला. आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीरच्या व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा : ३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या अँटिबॉडीज! सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष)

राज्यात पसरला असंतोष!

गेले महिनाभर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये रेमडेसिवीर मिळण्यावरून तीव्र असंतोष निर्माण झाला होता. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिवीरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप वाढायला लागल्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेमडेसिवीरचे वाटप करण्याचे आदेश सरकारने काढले. जागोजागी साठेबाज शोधण्याच्या कामाला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लागले. अखेर लोकांच्या संतापाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिविर मिळावे अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिवीर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.