नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील (Nagpur Blast) कंपनीत झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेतील मृत झालेल्या कामगारांना फडणवीस सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘X’वर सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
(हेही वाचा – Manodhairya Scheme : लैंगिक अत्याचार झालेल्यांना ‘मनोधैर्य’ चा आधार )
सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीला संवाद साधताना दिली आहे.
राज्य सरकार ठामपणे पाठीशी उभे आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Xद्वारे मृत कामगारांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, ‘नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वत: पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. ‘
हेही पहा –
Join Our WhatsApp Community