Swamini Savarkar : आनंदयात्री स्वामिनी सावरकर

नागपूरच्या महाल भागात विक्रमराव - स्वामिनीताईंनी आपलं बिऱ्हाड थाटलं होतं.

426
Swamini Savarkar : आनंदयात्री स्वामिनी सावरकर
Swamini Savarkar : आनंदयात्री स्वामिनी सावरकर

– मंजिरी मराठे

नागपूरच्या मंदाकिनी गोखले सावरकरांच्या घरात आल्या आणि विक्रमराव सावरकरांच्या ‘स्वामिनी’ झाल्या, (Swamini Savarkar) तो दिवस होता ११ मे १९५८. भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्रिवर्ग सावरकर बंधूंनी सर्वस्वाचा त्याग केला होता, अनंत हाल-अपेष्टा सोसल्या होत्या. स्वातंत्र्य मिळून ११ वर्ष झालेली होती, तरी सावरकरांशी संबंध सांगायलादेखील अनेकजण कचरत असतांना सावरकरांच्या घरात प्रवेश करणं सोपं नव्हतं. तारुण्यसुलभ वयाला साजेशी स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत, सुखासीन आयुष्य मिळण्याची शक्यता नाही, हे माहीत असूनही त्या दिशेनं पाऊल टाकणं, हे अत्यंत धाडसाचं होतं.

अत्यंत सत्शील, सत्प्रवृत्त पांडुरंग बळवंत उपाख्य आबाजी गोखले आणि सद्गुणी मनोरमा गोखले यांची मंदाकिनी ही मधली मुलगी. मोठी मुलगी सुधा कमलाकर रानडे (दुर्गा), धाकटी बहीण अरुंधती अरविंद घारपुरे (कुंदा) आणि भाऊ केशव अशी ही चार भावंडं. हे सारे नागपूरच्या महाजन चाळीत रहात असत. आबाजींचं कुटुंब दोन खोल्यात राहत असलं, तरी महाजन चाळ हेच एक मोठ्ठं कुटुंब होतं. सत्तर, पंचाहत्तर कुटुंब राहत असलेली ती कौलारू गोलाकार चाळ. एकमेकांची सुख-दुःखं आपलीच मानणारे चाळकरी. लग्नकार्य, सण समारंभ असो की कोणाची अडचण, सर्वजण एकत्र असत. कोणाच्याही अडीनडीला धावून जाण्याचे संस्कार नकळत मुलांवर होतच होते. चाळीतल्या सर्वांनाच आबाजींबद्दल खूप आदर होता. खरंतर महाजन चाळ प्रसिद्ध होती, ती आबाजी आणि वहिनी गोखले यांच्यामुळेच. आबाजींची परिस्थिती अगदी सामान्य होती, साधासा संसार होता. पण तरीही येणाऱ्या प्रत्येकाचं अत्यंत अगत्यानं स्वागत केलं जायचं. शिवराज प्रेसमध्ये ते नोकरी करायचे. त्यांना खूप काम पडायचं, घर चालवण्यासाठी रात्रपाळीही करायचे. पण त्याही परिस्थितीत आनंदी, संतुष्ट, समाधानी कसं रहायचं, हे त्या दाम्पत्याच्या वागणुकीतून मुलांमध्ये झिरपलं. कोंबड्यांच्या झुंजींपासून ते बैलाच्या शर्यतींपर्यंत सगळीकडे आबाजी मुलांना पायी घेऊन जायचे. चिंचा, आवळे, बोरं हाच सुकामेवा मानण्याचे ते आनंदाचे, छान दिवस होते.

मुलांची आई, मनोरमाबाई पहाटे ४ वाजताच उठत. मातृसेवासंघात शिकायला असलेल्या परिचारिकांसमोर प्रार्थना म्हणण्यासाठी, त्यांना संस्कारित करण्यासाठी त्या जात असत. ७ वाजता परत येऊन घरकामाला लागत. हलव्याचे दागिने बनवणं, रुखवत तयार करून देणं अशी कामं त्या करत असत. सारं कुटुंब त्यांना साहाय्य करत असे. अंगावर घेतलेलं काम ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी पूर्ण करून देणं यात जराही हयगय होत नसे. हे कलाकुसरीचे, व्यवस्थितपणाचे संस्कारही मुलांवर होतच होते.

कुंदाताईंच्या शब्दात सांगायचं तर, “कायम आनंदी, हसतमुख, प्रसन्न राहणारी आमची मंदा.
“तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् |
अनिकेत: स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नर: ||

याप्रमाणे वागणारी आमची मंदा. प्रत्येकासाठी तिचा जीव तुटायचा. स्वभाव जरासा हट्टी होता. अमुक एक गोष्ट अमुक पद्धतीनं झालीच पाहिजे हा आग्रहही असायचा. त्यामुळे रागवायचीदेखील. पण कोणावरचाही राग ती मनात ठेवत नसे.

कोणाच्याही घरी गेलं की, ही आपली पदर बांधून कामालाच लागायची. मी तिला म्हणत असे की, अगं, तुला हे सुचतं कसं? दुसऱ्याच्या घरी तू अशी मोकळेपणी कशी वावरू शकतेस? यावर मंदाचं उत्तर असे, आपण आपल्याच घरी वावरतो आहोत, असं समजायचं आणि दिसेल ते काम करायचं.”

सावरकरांच्या घरात आल्यावर मंदाताईंनी – स्वामिनीताईंनी त्या घरालाही आपलंसं केलं. त्यांचा संसार सुरु झाला तो भिवंडीत. त्यावेळी विक्रमराव ‘दांडेकर मशीन वर्क्स’ या कंपनीत नोकरी करत होते. उत्तम पगार होता, सुखाची नोकरी होती. पण मी कायम नोकरी करणार नाही, हे विक्रमरावांनी आपल्या पत्नीला आधीच सांगितलेलं होतं आणि लवकरच ते घडलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विक्रमरावांनी उडी घेतली. भिवंडीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते नागपुरात नव्यानं उघडलेल्या आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’च्या कार्यालयात रुजू झाले.

नागपूरच्या महाल भागात विक्रमराव – स्वामिनीताईंनी आपलं बिऱ्हाड थाटलं होतं. पण मोठा मुलगा पृथ्वीराज नऊ महिन्यांचा असतानाच विक्रमरावांच्या मामी विजया मनोहर केळकर यांचं अकाली निधन झालं. मामींच्या सहा आणि तीन वर्षांच्या मुलांचा, अभय आणि वैजयंतीचा सांभाळ करता यावा, यासाठी सावरकर कुटुंब मामांच्या मुक्कामी केळकर वाड्यात राहू लागलं. मनोहरमामा, बाबामामा, विक्रमरावांच्या मावशी कमलाबाई चितळे, चार लहान मुलं असं कुटुंब विस्तारलं. साहजिकच जबाबदारी वाढली. कमलामावशींप्रमाणेच स्वामिनीताईंनी पृथ्वीराज, रणजितसारखीच अभय, वैजयंतीलाही आईची माया दिली. कुठेही जाताना त्या सगळ्या मुलांना बरोबर घेऊन जात असत. इतकं की, त्या लहान वयात वैजयंतीला पृथ्वीराज आपला सख्खा लहान भाऊच वाटे. सुबत्ता तर नाहीच पण आर्थिक संकटाना तोंड देत त्यांनी साऱ्यांचं अतिशय निगुतीनं केलं. घरातल्या जेष्ठांची तर त्यांनी काळजी घेतलीच पण अडचणीत असलेल्या अनेकांना त्यांना आधार दिला, आपल्या घरी आसरा दिला.

१९६८ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘प्रज्वलंत’ साप्ताहिकाचं प्रकाशन सुरू झालं. पहिली तीन वर्ष विविध मुद्रणालयातून प्रज्वलंतचं मुद्रण होत असे. पण १९७१ मध्ये मात्र प्रज्वलंतच्या प्रकाशनासाठी नागपूरच्या रामदास पेठेत विक्रमरावांनी स्वतःचं कल्याण मुद्रणालय सुरू केलं. सुरुवातीच्या काळात छपाईच्या कामाकडे विक्रमराव जातीनं लक्ष देत. पण पुढे त्यांची राजकीय घोडदौड सुरु झाल्यावर मात्र स्वामिनीताईंनी मुद्रणालयाचं व्यवस्थापन, प्रज्वलंतची छपाई, वितरण ही सर्वच जबाबदारी सांभाळली. प्रज्वलंत बरोबरच डॉ. नारायण सावरकर अनुवादित ‘हिंदुत्व’ (मराठी), पु. ना. ओक लिखित ‘हिंदू विश्वराष्ट्राचा अितिहास’, आचार्य वि. स. जोग लिखित ‘अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारी’ अशा अनेक पुस्तकांची छपाई कल्याण मुद्रणालयात झाली.

मे १९८३पासून प्रज्वलंतचं प्रकाशन मुंबईतून सुरू झालं. मुंबईत स्वतःचा छापखाना नसल्यामुळे इतर अनेक मुद्रणालयातून प्रज्वलंतची छपाई होत असे. ती प्रकाशनाची धुरा स्वामिनीताईंनीच सांभाळली. १५ ऑगस्ट १९९३ ला विक्रमरावांनी मुरबाडमध्ये ‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूल’ची स्थापना केली. शाळेसाठी अनेकांच्या भेटीगाठी घेऊन निधी जमवण्यासाठी स्वामिनीताईंनी खूप धडपड केली. शाळेच्या व्यवस्थापनातही त्या अनेक वर्ष सक्रिय होत्या.

व्यवसाय आणि घर-संसार सांभाळताना स्वामिनीताईंना तारेवरची कसरत करावी लागली. पण त्यांनी समतोल साधला. आपल्या मुलांना त्यांनी शिस्तीत वाढवलं असलं तरीदेखील आपल्या इच्छेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य त्यांना होतं. त्यावेळी मुलांना वरखर्चाला पैसे देण्याची पद्धत नव्हती. घर पहिल्या मजल्यावर, नळाला रात्री पाणी येत असे आणि तेही कमी दाबानं. त्यामुळे एक मजला चढून पाणी भरण्यासाठी स्वामिनीताई मुलांना १ रुपया देत असत. प्रेस उघडणं, साफ करणं आणि बंद करणं यासाठीदेखील रोज १ रुपया मिळत असे. मुद्रणालयासमोरच शाळा असल्यामुळे धाकटा मुलगा रणजित १० वाजता प्रेस उघडून कामगार यायच्या आधीच साफसफाई करत असे. मालकाचा मुलगा म्हणून मुलांना कुठलीही विशेष वागणूक मिळत नसे. शाळा सुटल्यावर प्रेसमधील कंपोझिंग (खिळे जुळवणं), प्रिंटींग शिकण्यासाठी स्वामिनीताईंनी मुलांना प्रोत्साहन दिलं आणि लवकरच त्यांना प्रिंटींग मशीन चालवणं जमू लागलं. यातून मुलांना पैसे मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट, पैशाची किंमत याची जाण आणि भान निश्चितच आलं. त्यांनी मुलांकडून नुसती कामच करून घेतली नाहीत, तर त्या लहान वयात प्रेसमधील छोटे मोठे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही दिलं.

एकदा एका कामगाराला तो वेळेवर येत नसल्यामुळे रणजित रागावल्यावर त्यानं काम सोडण्याची धमकी दिली. रणजितनं त्याला जायला सांगितल्यावर तो घरी स्वामिनीताईंकडे गेला. स्वामिनीताईंनी त्याला एका आठवड्याची सुट्टी दिली आणि आपल्या लेकाचा शब्द खाली पडू न देता नंतर त्याला कामावर घेतलं. त्यामुळे लहान असूनही प्रेसमध्ये रणजितचा शब्द पाळला जाऊ लागला. या सगळ्या गोष्टींमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढून, स्वतंत्र निर्णय घेण्यास त्यांना मदतच झाली असेल.

रणजित सांगतात, “मी नववी-दहावीत असताना मला महिन्याला १००-१२५ रुपये मिळत होते. ते मी माझी रसायनशास्राची प्रयोगशाळा बनविण्यात आणि निसर्ग-यात्रांमध्ये खर्च करत असे. त्याचं मला पूर्ण स्वातंत्र्य होते. मी बाहेर जंगलात जात असे, तेव्हाही आईनं मला कधीही अडवलं नाही. मी संभाजीनगरमध्ये शिकण्यासाठी गेल्यावर पत्रं लिहिण्याचा कंटाळा करत असे. त्यामुळे आईनं मला ‘मी सुखरूप आहे. सगळं ठीक आहे’ असं लिहिलेली पोस्टकार्डच दिली होती आणि ‘दर आठवड्यात फक्त नियमानं ती पोस्टात टाक’, असं सांगितलं होतं.

त्यावेळी पैसे कमी असल्यामुळे ‘प्रज्वलंत साप्ताहिक’ पत्त्याच्या चिठ्ठ्या चिकटवून पोस्टात टाकण्याचं काम आम्ही घरीच करत असू. यात माझे मित्र-मैत्रिणी पण मदत करत असत. त्यावेळी आई नेहमीच खायला काहीतरी वेगळं करत असे किंवा चीचबिलाई, चिंचा, बोरं, आवळे, शिंगाडे आणि इतर खाऊ आणत असे. दुरुस्तीची कामं म्हणजे विजेची बटणं, छोटीमोठी उपकरणं दुरुस्त करणं, सायकलचं ओव्हर हॉलींग करणं इत्यादीत माझा मावसभाऊ श्याम जाणकार होता. त्याच्याकडून ही कामं शिकण्यास आईनं मला प्रोत्साहन दिलं.

जादूचे खेळ शिकण्यात मला विशेष रस होता. मी माझ्या कमाईतून हळूहळू जादुचे प्रयोग करण्यासाठी सामग्री जमवल्यावर सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये जादूचे प्रयोग करण्यास तिनं मला प्रोत्साहन दिलं. मी अर्ध्या तासाचे जादूचे प्रयोग करत असे. त्यामुळे मी सभा-धीट झालो. अर्थात हे काही माझं करियर नसल्यामुळे, मी बारावीत असताना मात्र तिनं सार्वजनिक प्रयोग करण्यात वेळ वाया न घालविता अभ्यास करण्यास सांगितलं.”

अगदी लहान वयात आईपासून दुरावलेल्या वैजयंतीताईंना कमलामावशी आणि स्वामिनीताई अशा दोन मातांचं निर्व्याज प्रेम मिळालं. वैजयंतीताई सांगतात, ‘मी तिला वहिनी म्हणत असले, तरी ती माझी आईच होती. आम्हा सगळ्यांसाठीच विक्रमराव – स्वामिनीवहिनी हे एक आदर्श जोडपं होतं. त्यांचा जोडा सुरेख दिसायचा आणि त्यांचा आम्हाला अतिशय अभिमान होता. स्वामिनीवहिनी अतिशय मनमोकळी, हौशी, हुशार, कर्तृत्त्ववान, धैर्यशील, उदार होती. आल्यागेल्याच्या हातावर काहीतरी ठेवल्याशिवाय ती सोडत नसे. तीच प्रथा पृथ्वीराज, मृणालनंही सुरु ठेवली. एखाद्यानं एखादी गोष्ट आवडली असं म्हटलं तर ती, त्याला ती वस्तू चटकन देऊन टाकत असे. तोच गुण रणजितमध्ये उतरला आहे. कुठल्याही गोष्टीची तक्रार, कुरकुर करताना मी तिला पाहिलं नाही. लहानपणापासून ते एमफिल करेपर्यंत माझ्या सगळ्या समस्यांचं उत्तर तिच्याकडे असायचं. एमफिलला मी झोपडपट्टी सुधार योजनांवर संशोधन प्रकल्प घेतला होता. ती इतकी धडाडीची होती की, तिला मी हे सांगितल्यावर, आम्ही चार झोपडपट्ट्यात जाऊन सर्व्हे करून आलो. नाही हा शब्दच तिच्या कोशात नव्हता. प्रत्येक गोष्ट ती मनापासून करायची. सिनेमा नाटक दाखवण्यापासून ते प्रज्वलंतचं काम शिकवण्यापर्यंत सारं काही माझी ‘या’आईनं केलं.”

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी स्वामिनीताई सहजपणे संवाद साधत असत. सावरकर विचारात मुरलेल्या स्वामिनीताईंना धर्माचं अवडंबर मान्य नव्हतं. देवाधर्मावर अवलंबून न राहता मेहनत करून आपण सारं काही मिळवू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांचं वाचन अफाट होतं. प्रत्येक गोष्टीचं त्यांना कुतूहल वाटत असे. त्यामुळेच माहीत नसलेली गोष्ट समजून घेण्यास, जाणून घेण्यास त्या कायमच उत्सुक असत. त्या आधुनिक विचारसरणी अंगीकारणाऱ्या होत्या; पण आपल्या जुन्या प्रथा, परंपरा पाळल्या पाहिजेत, या विचारांच्यादेखील होत्या. त्यांची नात भाग्यश्री, पृथ्वीराजदादांची मुलगी सांगते, “माझं लग्न झाल्यावर मी मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी घालावी, असं तिला वाटत; असे पण स्कर्ट किंवा शॉर्ट्स घातले तरी तितकंच कौतुक वाटे. सीआयडी मालिका आणि डिस्कव्हरी वाहिनी तिला प्रचंड आवडे. एखादा इंग्रजी शब्द कळला नाही की, ती लगेच मला फोन करून त्याबद्दल विचारत असे. अनेक लोकांशी तिचे अगदी मनापासून संबंध होते. लोकही तिला प्रेमानं फोन करून आयुष्यातल्या घडामोडी सांगत असत. तिला आग्रहानं भेटायला येत असत. माझ्या मित्र मैत्रिणींना आजी खूप आवडायची. सगळे एकदम फॅन होते तिचे. कधी कधी ते तिच्याशी गप्पा मारायला यायचे. तिला पण सगळ्यांशी बोलायला खूप आवडायचं. लक्षात ठेऊन ती प्रत्येकाची चौकशी करायची आणि फॉलोअप पण घ्यायची. माझं सगळं मित्रमंडळ तिला माहिती असल्यामुळे मीदेखील अनेकांच्या अनेक गोष्टी तिला सांगायचे आणि तीदेखील आवडीनं सगळं ऐकायची.”

स्वामिनीताईंनी आपल्या सुनांवर कुठली बंधनं घातली नाहीत. उपवास करा, साडीच नेसा किंवा अमुक गोष्टच करा असा कधी आग्रहही धरला नाही. आपल्या मुलाच्या, पृथ्वीराजच्या निधनाचं दुःख त्यांनी उतारवयात पचवलं आणि आपल्या सुनेच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात येऊन, त्या आवर्जून स्मारकाच्या कामकाजाची चौकशी करत, मार्गदर्शन करत. स्मारकातल्या सर्वच कर्मचाऱ्यांची आस्थेनं विचारपूस करत. आल्यावर प्रत्येकाच्या हातावर खाऊ ठेवत असतच पण अधूनमधून विशेष मेजवानीही देत असत.

विक्रमराव सावरकर हे वीर सावरकरांचे कृतीशील अनुयायी. त्यामुळे त्यांच्या कृतीची झळ स्वामिनीताईंनी मन:पूर्वक सोसली. सावरकर घराण्यातील येसूवहिनी, यमुनाबाई आणि शांताबाई या तीन अग्निशिखा. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत स्वामिनीताईंनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली, ती वाटचाल साधी सोपी नव्हती. तेदेखील एक ‘अग्निदिव्यच’होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.