गुन्हेगारी विश्वास खळबळ उडवून देणारे वृत्त पाकिस्तानच्या कराचीत येत आहे. मुंबईतून पाकिस्तानच्या कराचीत स्थायिक झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) कासकर याच्यावर विषप्रयोग करण्यात आलेला असून त्याच्यावर कराचीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. परंतु अद्याप या वृत्ताला तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणांकडून दुजोरा देण्यात आलेला नसून मुंबईत राहणारे दाऊदचे नातेवाईक देखील चिडीचूप असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या कराचीत राहणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे वृत्त रविवार रात्रीपासून झपाट्याने समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. दाऊद याला कराचीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पाकिस्तान स्थित सूत्रांकडून समोर येत आहे.
सूत्रांकडून अशीही माहिती समोर येत आहे की, कराचीतील सर्व इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आलेली आहे, दाऊदला कडक सुरक्षा व्यवस्थेत रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्याच्याकडे केवळ त्याच्या जवळच्या नातलगांना जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या या वृत्ताला अद्याप मात्र कुठल्याही तपास यंत्रणाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
दाऊद इब्राहिम याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील डोंगरी, पायधुनी या परिसरात दाऊद इब्राहिम याचे जवळचे नातलग तसेच बहिण हसीना पारकरचे कुटुंब राहण्यास असून मुंबई पोलिसांकडून या नातलगांकडून दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला आहे का याची माहिती काढण्यात येत आहे. परंतु त्यांना देखील याबाबत काहीही कल्पना नसल्याची माहिती काही नातेवाईकांकडून देण्यात येत आहे. याबाबत नातलग देखील चिडीचूप असून पोलिसांना दाऊद बाबत चकार शब्द देखील बोलत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबईत झालेल्या ९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि गुन्हेगारी जगताचा बादशहा दाऊद इब्राहिम कासकर हा ९३च्या बॉम्बस्फोटानंतर दुबई लपून बसला होता. दुबईतून भारतात गुन्हेगारी कृत्य करणारा दाऊद याने कालांतराने दुबईतून पळ काढत पाकिस्तान गाठले आणि कराचीत कुटूंबासह स्थायिक झाला. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी संघटनाना भारतात दहशतवादी कृत्य करणाऱ्या दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.