ऋजुता लुकतुके
भारतीय खेळाडूंनी एकदिवसीय मालिकेत (Ind vs SA 2nd ODI) विश्वचषकातील आपला फॉर्म कायम ठेवला. खरंतर खेळाडू बदलले होते, कर्णधार बदलला होता. पण, के एल राहुलच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीतही आपला दबदबा दाखवून दिला.
आता वेळ झालीय ती दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची. गेबेखा इथं होणाऱ्या या सामन्यात रिंकू सिंग किंवा रजत पाटिदार यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधी आहे. चौथ्या क्रमांकावरील श्रेयस अय्यर सेंच्युरियन इथं कसोटी संघात सामील झाला आहे. त्यामुळे ही जागा रिक्त आहे. टी-२० संघातील आतापर्यंतची कामगिरी बघितली तर रिंकू सिंग कधीपासून एकदिवसीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे. त्यामुळे त्याला संधी मिळू शकते.
(हेही वाचा-दोन विश्वचषक जिंकून देणारा एक धडाकेबाज क्रिकेटर आणि कर्णधार Ricky Ponting)
रिंकू सिंगने आतापर्यंत सहाव्या क्रमांकावर ‘फिनिशर’ म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याचा कस लागणार आहे. पण, प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कामगिरीमुळे रजत पाटिदारच्या पुढे त्याचा क्रमांक संघात लागू शकतो. आणि संजू सॅमसन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
बाकी अर्शदीप सिंग, आवेश कान आणि कुलदीप यादव यांनी आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. मुकेश कुमारही चांगली गोलंदाजी करत आहे. तर अक्षर पटेलला पहिल्या सामन्यात फारशी संधीच मिळू शकली नाही. त्यामुळे तो खेळणार हे ही निश्चित आहे. अशावेळी श्रेयसच्या जागी कोण एवढाच प्रश्न भारतासमोर आहे.
Tomorrow India will play the second ODI in 𝐆𝐪𝐞𝐛𝐞𝐫𝐡𝐚.
We ask #TeamIndia members to spell/pronounce the city’s name. Did they get it right?😀😎 #SAvIND pic.twitter.com/roxHxvuLUP
— BCCI (@BCCI) December 18, 2023
तर दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेत बरोबरीचं आव्हान आहेच. शिवाय मर्यादित षटकांच्या सामन्यात वर्चस्व मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. विश्वचषकानंतर आफ्रिकन संघातही बदल होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे क्विंटन डी कॉकची निवृत्ती. डी कॉक संघाचा एकखांबी तंबू होता. मोठ्या डावाबरोबरच ५० षटकं यष्टीरक्षण अशी अष्टपैलू कामगिरी तो करत होता.
तो गेल्यानंतर आफ्रिकेच्या मधल्या फळीत खड्डा निर्माण झालेला दिसतो आहे. ॲडम मार्करमला आता आपला खेळ उंचवावा लागेल. तर जानसेन, कोत्झीए यांच्यासह गोलंदाजीत फेलुकोवायोलाही मोठा वाटा उचलावा लागेल. केशव महाराज आणि तबरेझ शाम्सी यांची फिरकी किफायतशीर आहे. पण, आता त्यांना बळी टिपण्यात मोलाची भूमिका बजावावी लागणार आहे.
थोडक्यात, दक्षिण आफ्रिकेला आता लढायचंय ते मालिकेत बरोबरीसाठी आणि आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community