काश्मीर, लेह, लडाख परिसरात जोरदार हिमवृष्टी होत आहे. तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांचा वेग (Weather Update) हा ताशी १२ ते १५ किलोमीटर असल्याने राज्यात थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असल्याने महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये ११.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुढील दोन दिवसांत पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे.
शहरातील वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता
दक्षिण कोकण परिसरात चक्रवात स्थिती तयार झाल्याने पुढचे दोन दिवस शहरातील वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणेकर बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. किमान तापमानात घट झाली आहेच; पण त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानातही बरीच घट झाली आहे. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत आहे. कमाल तापमान पुढील काही दिवसही सरासरीच्या तुलनेत कमीच राहणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. यामुळे रात्रीची थंडी काहीशी कमी झाली, तरी दिवसभर गार वारे वाहणार आहेत. आठवडाभर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातही थंडीचा कडाका राहणार आहे.
(हेही वाचा – Cow Sanctuary: निराधार गायींना मिळणार नैसर्गिक अधिवास, देशातील पहिले ‘गोरक्षण अभयारण्य’ उभारणार; वाचा सविस्तर… )
मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज
दक्षिण कोकणात तयार झालेल्या चक्रवाताचा परिणाम मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जाणवणार असून, या विभागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात गारपीटही होईल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community