तिरुपती देवस्थानच्या अस्थाना नर्तकी (निवासी नृत्यांगना) होण्याचा मान मिळालेल्या Yamini Krishnamurthy

214

यामिनी कृष्णमूर्ती (Yamini Krishnamurthy) यांचा जन्म २० डिसेंबर १९४० रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले येथे झाला. यामिनीताई ह्या भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यात पारंगत आहेत. त्यांचे पूर्ण नाव मुंगरा यामिनी कृष्णमूर्ती असे होते. त्यांच्या नावाच्या बाबतीत आणखी एक गंमत म्हणजे त्यांच्या आजोबांनी त्यांचे नाव पूर्णतिलाका असे ठेवले.

अड्यार येथील ’कलाक्षेत्र’ ह्या संस्थेतून त्यांनी भरतनाट्यम नृत्यशैलीत पदविका शिक्षण घेतले. मग त्यांना सरकारी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्यांनी यल्लप्पा पिल्लै यांच्या भरतनाट्यमचे धडे गिरवले. त्याचबरोबर देतांतम्‌ लक्ष्मीनारायण शास्त्री आणि वेणुगोपाल कृष्ण शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुचिपुडी आणि ओडीसी नृत्याचे कौशल्य आत्मसात केले.

त्यांनी सुरुवातीला १९५७ मध्ये मद्रास येथे आपली कला सादर केली. गौरवाची बाब म्हणजे त्यांना तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अस्थाना नर्तकी (निवासी नृत्यांगना) होण्याचा मान मिळाला आहे. काही समीक्षकांचे असे मत आहे की यामिनी यांच्या नृत्यात एक विशिष्ट प्रकारची लयबद्धता आहे, जी मूळातच त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. त्यामुळे त्यांच्या नसानसांत नृत्य भिनलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

(हेही वाचा Veer Savarkar Mukti Shatabdi : सन्मान सावरकरांचा, जागर हिंदुत्वाचा; स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन)

त्यांना कुचीपुडी नृत्याच्या “मशाल वाहक” म्हणून ओळखले जाते. म्हणजेच त्यांनी कुचिपुडी नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात मोठा वाटा उचलला आहे. त्यांनी ’यामिनी स्कूल ऑफ डान्स’ या नृत्यशाळेची स्थापना केली आहे. तिथे त्या युवा पिढीला नृत्याचे शिक्षण प्रदान करतात. आपल्या नृत्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्यांनी ’अ पॅशन फॉर डान्स’ नावाचे आत्मचरित्र देखील लिहिले आहे.

यामिनी कृष्णमूर्ती (Yamini Krishnamurthy) यांना २००१ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याचबरोबर त्यांना १९६८ मध्ये पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या नृत्याच्या आविष्कारासाठी त्यांना इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.