२२ डिसेंबर रोजी भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस (National Mathematics Day) साजरा केला जातो. प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. गणिताच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि शाखांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे ते जगप्रसिद्ध गणितज्ञ होते.
रामानुजन हे प्रचंड बुद्धिमान होते. त्यांनी गणिताला केवळ वेगळी ओळखच दिली नाही तर अनेक प्रमेये आणि सूत्रे दिली जी आजही अतिशय उपयुक्त मानली जातात. गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेऊन त्यांचा जन्मदिवस ‘गणित दिवस’ किंवा ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी भारताच्या दक्षिण भागात असलेल्या कोईम्बतूरमधील इरोड नावाच्या गावात झाला. त्यांचा जन्म पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलतम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अय्यंगार होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले.
ते लहानपणापासूनच विलक्षण प्रतिभावंत होते. त्यांनी आपल्या हयातीत गणिताची ३,८८४ प्रमेये संकलित केली. यापैकी बहुतेक प्रमेये बरोबर सिद्ध झाली आहेत. अलीकडे त्यांची सूत्रे क्रिस्टलोग्राफीमध्ये वापरली गेली आहेत.
(हेही वाचाTuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरातील अलंकार चोरीच्या घटना चालूच; चांदीचा मुकुटही गहाळ)
राष्ट्रीय गणित दिवस (National Mathematics Day) साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची आवड निर्माण करून नैसर्गिक जिज्ञासा वाढवणे असा आहे. अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी भीती असते. ही मानसिक भीती दूर करण्यासाठी आणि कौशल्य विकास करुन गणित शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करून गणिताचे महत्त्व पटवून द्यावे असा हेतू देखील समोर ठेवण्यात आलेला आहे.
भारतातील सर्व राज्य वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रीय गणित दिन साजरा करत आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धा आणि गणितीय प्रश्नमंजुषा आयोजित केल्या जातात. या दिवशी आयोजित कार्यक्रमात संपूर्ण भारतातील गणितातील प्रतिभावंत आणि विद्यार्थी सहभागी होतात. विविध प्रकारच्या वस्तुनिष्ठ चाचणी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात येतात.
‘भारतीय गणित’, ‘जीवनासाठी गणित’ आणि ‘गणिताचे उपयोजन’ या स्पर्धा देखील घेतल्या जातात. याद्वारे मुलांमध्ये गणिताविषयी असलेली भीती काढून त्यांच्या मनात प्रेम आणि आत्मविश्वास निर्माण केला जातो.
Join Our WhatsApp Community