National Sports Awards: महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्राचे बॅडमिंटन पट्टू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

263
National Sports Awards: महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
National Sports Awards: महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

2023 वर्षासाठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (National Sports Awards) बुधवारी रात्री जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ९ जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यासह एकूण नऊ खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ व ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासोबतच ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. ‘मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना घोषित करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Parle Festival: २३वा ‘पार्ले महोत्सव’ शनिवारपासून सुरू होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन )

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्राचे बॅडमिंटन पट्टू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मलखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, तर ‘अर्जुन पुरस्कार’ हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.

ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत 21 वर्षीय ओजसने सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून आणखी एक विक्रम केला. नागपूरचा गोल्डन बॉय तिरंदाज ओजस देवतळे याच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव जाहीर झाले आहे.

(हेही वाचा – Sunil Tatkare : महायुतीच्या एकत्रित सभा घेण्याचा निर्णय; सुनील तटकरे यांची महिती)

सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720 पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

सलग चारवर्ष कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते. खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी ‘अर्जुन पुरस्कार’ दिला जातो. खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शन, नेतृत्व, खेळ आणि त्यातील शिस्तीसाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि खेळाडूंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी शिफारस केली जाते. खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ‘ध्यानचंद पुरस्कार’ दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉरपोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन’ पुरस्काराने गौरिवण्यात येते. आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

– मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन) अर्जुन पुरस्कार:ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’

– उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब). ’

– द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’

– ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.