- ऋजुता लुकतुके
एकीकडे महेंद्रसिंग धोनी आयपीएलचा नवीन हंगाम खेळण्यासाठी सिद्ध झाला आहे, दुसरीकडे त्याने निवृत्तीनंतर काय करणार हे एका व्हिडिओत सांगितलं आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचे चाहते महेंद्रसिंग धोनी पुन्हा संघाची कप्तानी करणार या बातमीने खूश आहेत. धोनीने एकूण पाच वेळा चेन्नई संघाला आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं आहे. २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी पाचदा चेन्नईने ही स्पर्धा जिंकली आहे. या हंगामात सुरुवातीला महेंद्रसिंग धोनी खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. पण, अखेर त्याने खेळणार असल्याचं स्पष्ट केलंय.
गेल्या हंगामातही तो गुडघ्याची दुखापत धेऊनच खेळला होता. हा हंगाम धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल अशी कुजबूज मात्र क्रिकेट वर्तुळात होत आहे. गेल्यावर्षी चेन्नईने आयपीएल जिंकल्यानंतर धोनीने निवृत्तीबद्दल विधान केलं होतं. ‘माझ्या संघाने आयपीएल जिंकली असताना निवृत्त होणं ही खरंतर योग्य वेळ आहे. पण, प्रेक्षकांकडून इतकं प्रेम मिळालंय आणि त्यामुळे हा निर्णय घेणं कठीण जातं. आयपीएलपूर्वी हातात ९ महिने आहेत. त्या कालावधीत शरीर काय सांगतं हे बघून निर्णय घेईन,’ असं धोनी त्यावेळी म्हणाला होता.
(हेही वाचा – Ayodhya Airport : विमानाची झाली यशस्वी ‘टेस्ट लँडिंग’)
आता नवीन हंगाम जवळ आल्यावर धोनी खेळेल की नाही, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि धोनी खेळाडूंच्या लिलावाच्या वेळी दुबईत दिसला, तेव्हाच या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आता एका व्हायरल व्हिडिओत धोनी निवृत्तीनंतर काय करणार हे ठरवताना दिसत आहे.
After Cricket, i want to spend Bit More Time With the Army ❤️😇#MSDhoni pic.twitter.com/6J7EaySSop
— Chakri Dhoni (@ChakriDhoni17) December 21, 2023
‘मी अजून विचार केलेला नाही. सध्यातरी मी आयपीएल खेळणार आहे. पण, त्यानंतर काय करेन आताच सांगता येणार नाही. पण, नक्की थोडा जास्त वेळ सैन्यदलाबरोबर काढणार आहे. अलीकडे मी फारसा त्यांच्यात मिसळलेलो नाही,’ असं उत्तर या व्हिडिओत धोनीने दिलं आहे.
धोनी हा भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल आहे. हा सन्माननीय किताब त्याला मिळाला आहे आणि त्यानंतर तो नियमितपणे सैनिकांबरोबर वेळ घालवतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community