Kho Kho News : राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत मुलींमध्ये धाराशिव तर मुलांमध्ये सोलापूरची बाजी

नंदूरबारमध्ये पार पडलेल्या कुमार गटातील अजिंक्यपद स्पर्धेत सोलापूरने पहिल्यांदाच कुमार गटातील विजेतेपद पटकावलं. 

246
Kho Kho News : राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत मुलींमध्ये धाराशिव तर मुलांमध्ये सोलापूरची बाजी
Kho Kho News : राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत मुलींमध्ये धाराशिव तर मुलांमध्ये सोलापूरची बाजी
  • ऋजुता लुकतुके

नंदूरबारमध्ये पार पडलेल्या कुमार गटातील अजिंक्यपद स्पर्धेत सोलापूरने पहिल्यांदाच कुमार गटातील विजेतेपद पटकावलं. (Kho Kho News)

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने नंदूरबार इथं घेण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत मुली गटात धाराशिवने नाशिकचा तर कुमार गटात सोलापूरने पुण्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सोलापूरने प्रथमच अजिंक्यपदावर मोहर उमटवली आहे. (Kho Kho News)

नंदूरबार येथे झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने नाशिकचा ७-४ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून धाराशिवने संरक्षण स्विकारले. त्याला साजेसा खेळ करत धाराशिवची राष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदेने ६.१० मि. संरक्षणाची खेळी करत नाशिकच्या आक्रमणाची हवाच काढून टाकली. तिला मैथिली पवारने (१.३० मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (नाबाद १ मि. संरक्षण) दमदार खेळी करत चांगली साथ दिली. यामुळे नाशिकला अवघे २ गुणच मिळवता आले. आक्रमणात धाराशिवने ७ गुण मिळवत नाशिकला मोठे आव्हान दिले. मात्र दुसऱ्या डावातील आक्रमणातही नाशिक चांगला खेळ करु शकला नाही.

या वेळी संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या अश्विनी शिंदेने पुन्हा चमकदार खेळ करत ४.५० मि. संरक्षण करत नाशिकला मोठी टक्कर दिली. मैथिली पवारने २.३० मिनिटे संरक्षण करत मोठ्या विजयाची संधी मिळवून दिली. यावेळीही नाशिकला २ खेळाडूच बाद करता आल्यामुळे धाराशिवने हा सामना ७-४ असा एक डाव ३ गुणांनी सहज जिंकत राज्य अजिंक्यपद पटकावले. नाशिकतर्फे सरिता दिवा (२.१० मिं. संरक्षण व १ गुण), ऋतुजा सहारे (१.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना मोठ्या पराभवापासून वाचवता आले नाही. (Kho Kho News)

(हेही वाचा – WFI Election : नवीन अध्यक्ष संजय सिंग यांनी तात्पुरत्या समितीचे सर्व निर्णय केले रद्द)

कुमार गटातील अंतिम सामना चुरशीचा झाला. जादा डावापर्यंत रंगलेल्या सामन्यात सोलापूरने पुण्याचा २४-२३ असा १ गुणाने निसटता विजय मिळवत अजिंक्यपदावर मोहर उमटवली. सोलापूरतर्फे गणेश बोरकर (२.१०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), कृष्णा बनसोडे (१.३०, १.१०, १ मि. संरक्षण व ३ गुण), प्रतिक शिंदे (१.२०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दमदार खेळ करत सोलापूरला कुमार गटात पहिले-वहिले अजिंक्यपद मिळवून दिले. पराभूत पुण्याच्या चेतन बिका (२, २.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), भावेश मेश्रे (१.२०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी दिलेली कडवी लढत अपुरी ठरली. (Kho Kho News)

स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू : गणेश बोरकर (सोलापूर) , अश्विनी शिंदे (धाराशिव)
सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू : चेतन बिका (पुणे), सानिका चाफे (सांगली)
सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू : फराज शेख (सोलापूर) , सुहानी धोत्रे (धाराशिव) (Kho Kho News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.