अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारीला साजरा होणार आहे. केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील हिंदू या सोहळ्याची आतुरतेने वाट बघत आहेत. या दिवशी संतांच्या उपस्थितीत अयोध्येतील श्री राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे जगभरातील हिंदू या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिकेत स्थायिक झालेला हिंदू समुदाय आठवडाभराचा सण साजरा करणार आहेत. तेथील सर्व मंदिरांमध्ये विशेष पूजाविधी पार पाडण्यात येणार आहे.
श्री राम मंदिरात २२ जानेवारीला राम लल्लांच्या अभिषेकाच्या एक आठवडा आधी म्हणजेच १५ जानेवारीपासून अमेरिकेतील मंदिरांमध्ये भाविकांची लगबग सुरू होईल. त्यामुळे उत्सवापूर्वीच अमेरिकेतील मंदिरांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील मंदिरांची सर्वात मोठी व्यवस्थापन संस्था असलेल्या हिंदू टेंपल एक्झिक्युटिव्ह कॉन्फरन्सने याविषयी सांगितले की, आम्ही हिंदू भाग्यवान आहोत. देवाने या ऐतिहासिक आणि महान क्षणाचे आम्हाला साक्षीदार केले आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षा आणि संघर्षानंतर हा अनमोल क्षण आमच्या आयुष्यात आला आहे.
अमेरिकेतील हिंदू बांधवांचा पवित्र कार्यात पुढाकार
अयोध्येत होणाऱ्या श्री रामाच्या अभिषेक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यावेळी अमेरिकेतील हिंदूंना पाहता येईल तसेच प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होताच शंख वाजविला जाईल. कार्यक्रम संपल्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. अमेरिकेतील संपूर्ण हिंदू समुदायाला या विशेष पूजेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या उद्देशाने सुरू असलेल्या या पवित्र कार्याला हातभार लावण्यासाठी तेथे राहणारे हिंदू बांधव स्वेच्छेने पुढाकार घेत आहेत.
(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येत प्रथमच विमान उतरले, चाचणी यशस्वी झाल्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले? वाचा सविस्तर… )
अमेरिकेतील सर्व मंदिरांमध्ये विशेष उत्सव
श्री राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत अमेरिका आणि शेजारील देश कॅनडामधील हिंदूंमध्ये उत्साह आहे. त्यांच्या अंतःकरणात श्रद्धेच्या भावनेने, भव्य मंदिरात भगवान श्रीरामाची स्थापना केलेली मूर्ती पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. अमेरिकेतील मंदिरांची ही संस्था १,१०० हिंदू मंदिरे चालवते. उत्तर अमेरिकेतील सर्व लहान-मोठ्या मंदिरांमध्ये हा विशेष उत्सव आठवडाभर चालणार असल्याची माहिती हिंदू टेंपल एक्झिक्युटिव्ह कॉन्फरन्सने दिली.
अभिषेक सोहळ्याचे खास आयोजन
– १५ जानेवारी २०२४ रोजी सुरू होणार्या या सोहळ्याची सांगता २२ जानेवारी रोजी अयोध्येतून श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होईल. अमेरिकेतही हजारो भाविक प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहणार आहेत. भारतात २२ जानेवारीची सकाळी नागरिकांना हा सोहळा पाहता येईल, तर अमेरिकेतील नागरिक २१ जानेवारीला रात्री हा भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहू शकतील. सर्व भाविक प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यात ऑनलाइनच सहभागी होतील.
– मंदिर व्यवस्थापन संस्थेने सांगितले की, अमेरिकेतील अनेक मंदिरांच्या पुजाऱ्यांनी १५ जानेवारीपासून कीर्तन सेवा सुरू करण्यास आनंदाने मान्यता दिली आहे. अनेक मंदिरांमध्ये २१-२२ जानेवारीला विशेष कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. या सोहळ्याला अलौकिकत्व प्राप्त व्हावे याकरिता स्थानिक मंदिरांनीही आपापल्या स्तरावर आपला सहभाग सुनिश्चित केला आहे.
– १५ जानेवारीपासूनच भगवननाम संकीर्तन सुरू होईल. अमेरिकेतील प्रत्येक मंदिरात श्रीरामनामाचा अखंड गजर ऐकू येईल. नामसंकीर्तनासोबतच श्रीरामाच्या १०८ नामांचा जप करण्यात येणार आहे. अटलांटा येथील प्रसिद्ध भजन गायक विनोद कृष्णन हे भजन सादर करणार आहेत. ते आपली भजनसेवा प्रभू श्रीरामाला समर्पित करणार आहेत तसेच २१ जानेवारीला सर्वच मंदिरे दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community