सोमवारी नाताळ आणि त्याआधी सप्ताहअखेर शनिवार- रविवार लागून आल्याने ‘लॉंग विकेंड’ मुंबईबाहेर साजरा करण्यासाठी मुंबईकर लोणावळा, गोवा, वसई, पालघरच्या दिशेने निघाले असल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, (Mumbai Pune Expressway) मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबईकरांचा सर्वाधिक गर्दीचा ओघ लोणावळा-खंडाळ्याकडे आहे. अनेकांनी नाताळच्या आधी शनिवार-रविवार ते थेट नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी मोठी सुट्टी घेतली आहे. रविवारी पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना लोणावळ्याला जायला तीन ते चार तास लागले.
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक मुंबईकर अलिबाग, किहिम या समुद्रकिनाऱ्यांकडे वळले आहेत. त्यामुळे लोणावळा, खंडाळा, अलिबाग येथे जाणाऱ्यांची गर्दी वाढली . त्यामुळे पनवेलजवळ एक तास वाहतूक कोंडी होऊन ती दुपारपर्यंत होती तसेच ठाण्यातील घोडबंदर रोडवरून अनेक पर्यटक वसईच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे पर्यटकांची वाहने फाऊंटन हॉटेल नाक्यावर वाहतूक कोंडीत अडकली होती. एकंदरीत मुंबईबाहेर पडणाऱ्या सर्वच चेकनाक्यावर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारपर्यंत रांगा दिसत होत्या. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यास रविवारी, (२४ डिसेंबर) ३५ तासांनंतर पोलिसांना यश आले.
हेही पहा –