शीव-पनवेल महामार्गावर, मानखुर्द जंक्शन ते वाशी टोल नाका या परिसरात स्वच्छता कामांमध्ये कुचराई केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच त्यास कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या भागात अनधिकृतपणे राडारोडा (डेब्रिज) टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. (Deep Cleaning Drive)
स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेकडून प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) याप्रमाणे सर्व चोवीस विभागांमध्ये, टप्प्या-टप्प्याने तसेच व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Drive) राबविण्यात येत आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर स्वच्छता अभियान सुरू आहे. (Deep Cleaning Drive)
(हेही वाचा – BMC : मालाड, गोरेगाव आणि विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिमधील पुलांची डागडुजी)
याच पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी मानखुर्द परिसरात भेट दिली. यावेळी त्यांना मानखुर्द टी जंक्शन ते वाशी टोल नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. याबाबत डॉ. शिंदे यांनी उप आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि सहायक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाने यांच्या माध्यमातून एम पूर्व विभागाचे सहायक अभियंता यांची सुट्टी त्वरित रद्द करुन हा परिसर कचरामुक्त करण्याचे आदेश दिले. (Deep Cleaning Drive)
तसेच, शीव-पनवेल महामार्गाच्या यांत्रिकी स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर कामात कुचराई केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड आकारुन कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ यांत्रिकी झाडू, २५ कामगार, १ जेसीबी मशीन, १ बॅाबकॅट मशीन, २ डंपर लावून हा परिसर कचरामुक्त करण्यास सुरुवात केली. या परिसरातून सोमवारी ५ डंपर अनधिकृत राडारोडा उचलण्यात आला. मानखुर्द टी जंक्शन परिसरात अनधिकृत वारंवार राडारोडा टाकला जातो. त्यामुळे, अनधिकृतपणे वारंवार राडारोडा टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Deep Cleaning Drive)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community